सुवर्णतेजाने रंगला कौतुकसोहळा
By admin | Published: September 27, 2014 02:35 AM2014-09-27T02:35:16+5:302014-09-27T02:35:16+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०० वा दीक्षांत समारोह शुक्रवारी थाटात पार पडला.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०० वा दीक्षांत समारोह शुक्रवारी थाटात पार पडला. चांगले गुण मिळविण्यासाठी प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टांना शाबासकी देण्याच्या कौतुक सोहळ्याचा अनुभव उपस्थितांनी टिपून घेतला. विशेषत: ‘मिसाईल मॅन’ डॉ. कलाम यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. दीक्षांत समारंभात पद्मश्री डॉ. विजय भटकर यांना मानद डी. लिट., नय्यर परवनी मोहम्मद हनिफ सिद्दिकी यांना मरणोपरांत तर डॉ. प्रभाकर गद्रे यांना डी. लिट.ने सन्मानित करण्यात आले. दीक्षांत समारोहात विद्यापीठाच्या निरनिराळ्या परीक्षांमधील १८४ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना २९२ सुवर्णपदके, ४३ रौप्यपदके, १०२ पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय विविध विद्या शाखांमधील ९९८ विद्यार्थ्यांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला डॉ.कलाम यांची उपस्थिती मर्यादित वेळेपुरतीच असल्याने निवडक ११ विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पदक व पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विद्यार्थिनींचेच वर्चस्व
नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत सोहळ्यात पदक विजेत्यांमध्ये विद्यार्थिनींचेच वर्चस्व दिसून आले. एसएफएस महाविद्यालयाच्या प्रियंका बेरत्रम हिचा सर्वाधिक १७ पदके व पारितोषिकांनी सन्मान करण्यात आला. ती बी.एस्सी. अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. त्याखालोखाल जी.एच.रायसोनी कॉलेज आॅफ लॉ येथील खुशबू दिलीप छाजेड व . दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या आशुतोष मधुकर आपटे याचा एलएलबी (पाच वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेतील यशाबद्दल प्रत्येकी १५ सुवर्णपदकांनी सन्मान करण्यात आला. ब्रह्मपुरी येथील डॉ. आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयाच्या नरेश माणिकराव मोरे हा एमए (इतिहास) या विषयात सर्वाधिक गुणांसह ११ पदकांचा मानकरी ठरला. या सोहळ्यादरम्यान विविध परीक्षांमधील १८४ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना २९२ सुवर्ण पदके, ४३ रौप्य पदके, १०२ पारितोषिके अशी एकूण ४३७ पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कलाम मराठीत बोलतात तेव्हा...
आपल्या भाषणाला सुरुवात करण्याच्या वेळी डॉ. कलाम यांनी उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. आतापर्यंत माझ्या कानावर मोठ्या प्रमाणावर मराठी भाषा आली आहे. नागपूर विद्यापीठातील बहुतांश विद्यार्थी मराठी आहेत. मराठी उत्तम भाषा असून मला ती आवडते. त्यामुळेच मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो असे डॉ.कलाम म्हणाले. ‘नागपूर विद्यापीठातील सर्वच विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो, असे डॉ.कलाम यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.