पाच वर्षांत असे वाढेल नागपूरचे सौंदर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:58 AM2019-07-18T11:58:47+5:302019-07-18T11:59:38+5:30
येत्या पाच वर्षांत नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करून देशात क्रमांक एकचे सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे.
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या पाच वर्षांत नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करून देशात क्रमांक एकचे सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार, या प्रकल्पासाठी ‘नागपूर शहर सौंदर्यीकरण समिती’ स्थापन करण्यात आली असून, त्यांनी यासाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आहे. समितीच्या नियंत्रणाखाली शहरातील रस्ते, तलाव, नदी, नाले, मैदाने, उद्याने व मोकळ्या जागांना लोकसहभागातून वृक्षारोपणाने हिरवेगार करण्यात येणार असून, जागतिक स्तराच्या शहरानुसार सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.
प्रकल्पासाठी समितीचे समन्वयक म्हणून वनस्पती तज्ज्ञ व सौंदर्यीकरणाच्या विविध प्रकल्पाचा अनुभव असलेले दिलीप चिंचमलातपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचमलातपुरे यांनी लोकमतशी बोलताना या प्रकल्पाविषयी माहिती दिली. हा नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, बांधकाम विभागाचे अधिकारी, महापौर व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांशी विविध स्तराच्या बैठका घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शहर सौंदर्यीकरणाचे हे कार्य पूर्णपणे लोकसहभागातून राबविण्यात येणार असून, त्यासाठी शाळा-महाविद्यालयांचे प्रशासन व विद्यार्थी, तसेच विविध नागरिक संस्था व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाचा पहिला टप्पा रस्त्यांवर केंद्रित करण्यात आला आहे. शहरात २७०० किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला व दुभाजकांवर वाहतुकीला व विद्युतीकरणाला अडचण होणार नाही, अशा पद्धतीने विशिष्ट प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत. यापुढे शहरातील लहान-मोठी उद्याने नव्याने वृक्षाच्छादित करण्यात येणार आहेत. याअंतर्गत औषधी वनस्पती, वेदिक वनस्पती, अधिक काळ टिकणाºया वनस्पती, फुलझाडे व फळझाडांचा समावेश राहणार आहे. मैदानांच्या सभोवताल व उपयोगात नसलेल्या मैदानात पूर्णपणे वृक्षारोपण करण्यात येणार आहे; शिवाय शक्य होईल तिथे हर्बल गार्डन विकसित करण्याचाही समितीचा प्लॅन आहे. या उद्यानात बसण्या-उठण्या व फिरण्याची विशेष सोय करण्यात येणार आहे. यानंतर शहरातील १२ तलावांचे खोलीकरण करून ही माती रस्ते दुभाजकांमध्ये वापरण्यात येणार आहे. तसेच तलावांच्या सभोवारही सुंदर अशा झाडांची लागवड करून सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. नदी आणि नाल्याच्या काठावरही औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती व अधिक काळ टिकाणाºया निलगिरी, अर्जुन यासारख्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तलावांना सुंदर असे रूप मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे चिंचमलातपुरे यांनी सांगितले. काही तलावांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशा तलावांच्या सभोवताल १२ ते १४ फुटाचे फेन्सिंग लावण्यात येईल व केवळ विशिष्ट गेटमधूनच विशिष्ट वेळेत प्रवेश देण्यात येण्याची योजना आखण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारे टप्प्याने संपूर्ण शहराला नवे रूप देण्यात येणार आहे.
सध्या या संपूर्ण प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या निधीतून आवश्यक साहित्य खरेदी करण्यासह सामाजिक संस्था, नागरिक व शाळा-महाविद्यालयांना या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.