‘ही तर भारतीय खेळांच्या सुवर्णयुगाची नांदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 08:30 AM2021-09-18T08:30:00+5:302021-09-18T08:30:02+5:30
Nagpur News टोकियोतील ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली ऐतिहासिक कामगिरी ही भारतीय क्रीडा क्षेत्राच्या सुवर्णयुगाची नांदी असल्याचे मत फिट इंडिया मुव्हमेंटचे ब्रॅन्ड ॲम्बेसडर आणि स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. अर्जुनसिंग राणा यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टोकियोतील ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली ऐतिहासिक कामगिरी ही भारतीय क्रीडा क्षेत्राच्या सुवर्णयुगाची नांदी असल्याचे मत फिट इंडिया मुव्हमेंटचे ब्रॅन्ड ॲम्बेसडर आणि स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. अर्जुनसिंग राणा यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. (‘This is the beginning of the golden age of Indian sports’)
मैत्री परिवारतर्फे आयोजित मैत्री गौरव शारीरिक शिक्षण पुरस्कार सोहळ्यासाठी आलेले राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय क्रिकेट संघाचे फिजिओ राहिलेले राणा म्हणाले, ‘खरेतर हा नव्या भारताचा उदय आहे. केन्द्र शासनाने खेलो इंडियासारख्या योजनांच्या माध्यमातून ऑलिम्पिकमधील कामगिरीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. योजनेच्या माध्यमातून प्रतिभावान आणि मेहनती खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध होत आहेत.’
फिट इंडिया मुव्हमेंट ही संकल्पना मांडताना अमरावतीच्या एचव्हीपीएममधून शारीरिक शिक्षणात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेले राणा पुढे म्हणाले,‘फिट इंडिया योजनेचा उद्देश प्राणायाम आणि योगसाधनेच्या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक सुदृढता आणणे हा आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने काम सुरू आहे. शाळा सुरू झाल्यानंतर योजनेचा विस्तार केला जाईल.
रातुम नागपूर विद्यापीठात लवकरच फिट इंडिया क्लबची स्थापना केली जाईल. यात क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांना सहभागी करून घेतले जाईल, या बाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंशी बोलणे झाल्याची माहिती राणा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
टोकियो ऑलिम्पिकमधील नेमबाज आणि तिरंदाज यांच्या अपयशाबाबत विचारताच राणा म्हणाले, ‘प्रत्येक दिवस सारखा नसतो. यात खेळाडूंची मानसिकता महत्त्वपूर्ण ठरते. माझ्या मते, पुढील ऑलिम्पिकमध्ये आमचे नेमबाज आणि तिरंदाज पदके जिंकण्यात यशस्वी होतील.’ यावेळी मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, डॉ. शरद सूर्यवंशी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
रॉडनी मार्शने आणली जिम संस्कृती
राणा यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या यशात खेळाडूंचे फिटनेस महत्त्वाचे ठरल्याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत फिटनेसला फार महत्त्व देण्यात आले. २००० ला रॉडनी मार्श यांनी भारतीय क्रिकेटमध्ये जिम संस्कृती रुजविली. कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी मत मांडताना ते म्हणाले, ‘हा कोहलीचा वैयक्तिक निर्णय असावा.’