लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार रोज घडतो. विशेष म्हणजे, कामाचा जाब विचाराला जात नसल्याने लाभार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या १२ क्रमांकाच्या खोलीत योजनेचे कार्यालय आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी आरोग्यमित्र दिले आहेत. परंतु येथे रुग्णाच्या नातेवाईकांनाच योजनेची मंजुरी मिळण्यापासून ते रुग्णालयातून सुटी घेण्यासाठीचे सर्व सोपस्कार स्वत:लाच करावे लागतात. येथील आरोग्यमित्र केवळ नावालच आहे. सर्व कामे रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांकडून करून घेतात. स्वत: अधिकाऱ्यांसारखे वागतात. रुग्णालय प्रशासनाने या योजनेचे काम सुरळीत चालावे म्हणून दोन वैद्यकीय अधिकारी व दोन ‘डाटा प्रोसेसर’ दिले. परंतु त्यांच्या कामाला घेऊनही अनेक तक्रारी आहेत. वैद्यकीय अधिकारी वरिष्ठांना न सांगताच सुटी घेतात. सोमवारी सकाळी १०.३० वाजले तरी वैद्यकीय अधिकारी आलेले नव्हते. ‘सीव्हीटीएस’ विभागात सोमवारी एका महिलेवर तातडीने हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. महिला रुग्ण योजनेतील लाभार्थी आहे. यामुळे नातेवाईक सकाळी ६ वाजेपासून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १२ क्रमांकाच्या खोलीच्या खिडकीवर उभे होते. परंतु १०.३० वाजता ‘डाटा प्रोसेसर’ने आज घेण्यात येणाऱ्या रुग्णांची यादी तयार झाली असल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, अशा केसेस ‘इमरजन्सी टेलिफोनिक इन्टिमेशन’ (ईआयटी) अंतर्गत मोडतात. ७२ तासांत योजनेची मंजुरी मिळणे आवश्यक असते. परंतु जाब विचारणारे कुणीच नसल्याने मनमानेलपणा सुरू आहे.तक्रार केली म्हणून नातेवाईकांवर ओरडले कर्मचारीयोजनेतील वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नाही, जागेवर राहत नाही, डाटा प्रोसेसर यांची कामाबाबत उदासीनता, आरोग्यमित्रांचा चालढकलपणा याबाबत हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रार का केली म्हणून, रुग्णाच्या नातेवाईकांवर येथील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. यामुळे नातेवाईकामध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकाराबाबत नातेवाईक मंगळवारी अधिष्ठात्यांना लेखी तक्रार करणार आहे.