आदिवासी समाज संस्कृतीसोबतच जल, जमीन आणि जंगलांचा रक्षक : मुख्यमंत्री फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:02 PM2019-02-09T22:02:18+5:302019-02-09T22:03:37+5:30
नागपूर आणि परिसराला गोंड राजाची समृद्ध परंपरा लाभली असून, देशातील जल, जमीन आणि जंगलांचे रक्षण करण्याचे काम आदिवासी समाजाने पूर्वीपासूनच केले आहे. आजही समृध्द संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम आदिवासी समाज करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर आणि परिसराला गोंड राजाची समृद्ध परंपरा लाभली असून, देशातील जल, जमीन आणि जंगलांचे रक्षण करण्याचे काम आदिवासी समाजाने पूर्वीपासूनच केले आहे. आजही समृध्द संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम आदिवासी समाज करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महापालिकेतर्फे फुटाळा तलाव येथे दोन दिवसीय आदिवासी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गजकरी, खा. फग्गनसिंग कुलस्ते, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आ. सुधाकरराव देशमुख, आ. डॉ. परिणय फुके, ‘नागपूर का राजा’ महानाट्याचे निर्माते अमित कोवे उपस्थित होते.
स्व. चिंतामन इवनाते यांनी नागपुरात परंपरागत आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या हेतूने या महोत्सव आयोजनाची संकल्पना मांडली. तसेच त्यांनी आदिवासींना एकत्र करून मोठे आंदोलन उभारले. या भागात आदिवासींची अतिशय समृध्द अशी संस्कृती असून, तितकीच मोठी वेगळी परंपरा जोपासली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पूर्वीपासूनच आदिवासी समाज हा जंगलाच्या सान्निध्यात राहिल्याने देशातील जल, जंगल आणि जमिनीचा संरक्षक राहिला आहे. हे करत असताना आदिवासींनी आपली वेगळी आणि समृद्ध परंपरा जोपासत संस्कृती जिवंत राहावी, यासाठीही मोठी मेहनत घेतली आहे. आजही आदिवासी संस्कृतीचे वेगवेगळे रंग आहेत, त्यातून वेगवेगळ्या छटा अभिव्यक्त केल्या जात आहेत. राजे बख्त बुलंद शहा यांनी या आदिवासी संस्कृती, समाजाला मोठा आकार, आधार दिला, त्यासोबतच परंपरा आणि स्वतंत्र अस्मिता दिली. या संस्कृती, परंपरेला नागपूरकरांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यानंतर नागपूर का राजा महानाट्याचे अमित कोवे आणि चमूने सादरीकरण केले.