‘पॉन्झी’ योजनांपासून सावधगिरी बाळगा: मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:24 PM2019-08-07T23:24:16+5:302019-08-07T23:26:38+5:30

सामान्य नागरिकांचा छोट्या गुंतवणुकीकडे जास्त कल असतो. बाजारातील ‘पॉन्झी’ योजनांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आ. गिरीश व्यास यांनी येथे केले.

Beware of 'Ponzi' Plans: Rhymes of Dignity | ‘पॉन्झी’ योजनांपासून सावधगिरी बाळगा: मान्यवरांचा सूर

चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी आ. गिरीश व्यास, सीए सुरेन दुरगकर आणि आर्थिक तज्ज्ञ.

Next
ठळक मुद्देसीए संस्थेतर्फे ‘निवेश पाठशाला’वर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामान्य नागरिकांचा छोट्या गुंतवणुकीकडे जास्त कल असतो. कमी वेळात जास्त परतावा मिळविण्यावर भर असतो. या कारणामुळे ते खोट्या आर्थिक योजनांच्या जाळ्यात अडकतात. त्यांना दुप्पट रक्कम कधीच मिळत नाही. अखेर ते नशीबाला दोष देतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीपूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि बाजारातील ‘पॉन्झी’ योजनांपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आ. गिरीश व्यास यांनी येथे केले.
आयसीएआयच्या नागपूर सीए शाखेतर्फे भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण फंड (आयईपीएफ)अंतर्गत इक्विटी गुंतवणूकदारांसाठी ‘निवेश पाठशाला’ या शीर्षकाखाली चर्चासत्राचे आयोजन धंतोली येथील सभागृहात करण्यात आले. यावेळी नागपूर संस्थेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर, सीए डॉ. टी.एस. रावल, सीए जुल्फेश शाह, हरीश शनवारे, कोषाध्यक्ष सीए जितेन सागलानी, सचिव सीए साकेत बागडिया, सीए महेश अग्रवाल, सदस्य सीए हरीश रुगवानी उपस्थित होते.
व्यास म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वेगवेगळ्या मायक्रो-इकॉनोमिक डेटाद्वारे दर्शविल्या जाणाऱ्या आर्थिक स्थिरतेद्वारे मोजली जाते. सरकारी योजना आणि अंतिम लाभार्थी यांच्यातील मध्यस्थता दूर करून ‘सबका साथ सबका विश्वास’हा पंतप्रधानांचा दृष्टिकोन विश्वास व सेवा वचनबद्धतेचे वातावरण तयार करण्यासाठी आहे. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्यासाठी राज्य शासन आणि केंद्राच्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
रावल यांनी मूलभूत विश्लेषणाच्या महत्त्वाच्या बाबींबद्दल व इक्विटींमध्ये गुंतवणूक करण्यावर मार्गदर्शन केले. त्यांनी गुंतवणूकदार आणि फंड मॅनेजरच्या गुंतवणुकीची शैली सांगितली. हरीश शनवारे यांनी इक्विटीमध्ये व्यापार करताना चार्ट व तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व विशद केले. त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून गुंतवणुकीची माहिती दिली. ते म्हणाले, इक्विटीमध्ये व्यवहार करताना नेहमीच ट्रेंडबरोबर राहा. ट्रेंड हा तुमचा चांगला मित्र आहे.
प्रारंभी सुरेन दुरगकर यांनी पाहुणे व वक्त्यांचे स्वागत केले आणि आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जनजागृतीचे महत्त्व सांगितले. इक्विटी गुंतवणुकीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांच्या विचारविनिमयातून गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. गुंतवणूक करताना सीएंचा सल्ला घेण्याचे आवाहन केले. यावेळी १५० पेक्षा जास्त गुंतवणूकदार उपस्थित होते.

 

Web Title: Beware of 'Ponzi' Plans: Rhymes of Dignity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.