नागपूर : सकल जैन समाजाच्यावतीने महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही येत्या ६ एप्रिल रोजी या महोत्सवाचे आयोजन निश्चित करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे स्थगित करण्यात आला आहे.महोत्सवाची तयारीही सुरू करण्यात आली होती. संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. या प्रभावामुळे सर्व शासकीय कार्यक्रमांसह सामाजिक संघटनांचे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता राष्टÑीय सकल जैन समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.सकल जैन समाजाचे राष्टÑीय अध्यक्ष तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी निखिल कुसुमगर, अनिल पारख, नितिन खारा, संतोष पेंढारी, नरेश पाटनी, उज्ज्वल पगारिया, दिलीप रांका, अतुल कोटेचा, सुरेंद्र लोढा, मनीष मेहता, माधुरी बोरा, प्रतीक सरावगी उपस्थित होते. दर्डा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा देशावर संकट ओढवले, तेव्हा सकल जैन समाज सरकारसोबत भक्कमपणे उभा राहिला आहे आणि प्रत्येक विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी समाजाने सहकार्य केले आहे. जैन समाज नेहमीच शाकाहाराच्या प्रचार प्रसाराचा संदेश देत आला आहे आणि शाकाहार स्वीकारण्याचे आवाहन करीत आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांसाठी सकल जैन समाजातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ११ लक्ष रुपये निधी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगले काम करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव स्थगित, सकल जैन समाजाच्या बैठकीत घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 5:05 AM