भागवत कराड, उदय सामंत फडणवीसांना भेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 07:35 AM2024-04-14T07:35:42+5:302024-04-14T07:36:33+5:30
महायुतीच्या जागावाटपात छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेनासा झाला आहे.
नागपूर: महायुतीच्या जागावाटपात छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेनासा झाला आहे. गुरुवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी नागपुरात दाखल होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत संबंधित मतदारसंघांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
फडणवीस यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कराड म्हणाले, परभणी, हिंगोली, नांदेड या तीन लोकसभेचा क्लस्टर प्रमुख असून, त्याचा अहवाल देण्यासाठी मी आलो होतो. सामंत म्हणाले, की मी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना भेटलो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गवर चर्चा झाली अशातला भाग नाही. विदर्भातील यवतमाळ, हिंगोली, वाशिम या सगळ्या संदर्भातील आढावा मी उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला. नारायण राणे हे महायुतीतले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी माझे म्हणणे मांडणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी हा मुद्दा अधिक न ताणण्याचे संकेत दिले.