नागपूर : देशात परिवर्तन घडविण्यासाठी शरद पवार हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांना राजकीय व प्रशासकीय दीर्घ अनुभव आहे. या परिवर्तनासाठी पवार जे काही प्रयत्न करतील त्यासाठी देशभरात व्याप्ती असलेली आमची संघटना व आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करायला तयार आहोत. संविधानाला तडा देणाऱ्यांविरोधात लढा देण्यासाठी संघटित शक्तीचे बळ पवारांच्या पाठीशी उभे करू, अशी जाहीर घोषणा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केली.
भटक्या- विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्रचे सुवर्णमहोत्सवी अधिवेशन शनिवारी सुरेश भट सभागृहात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. शरद पवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर होते. मंचावर कोल्हापूरचे श्री शाहू शहाजी छत्रपती महाराज, राजे संग्रामसिंह भोसले, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, लक्ष्मण माने, हिरालाल राठोड, डॉ. कल्पना नलावडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शरद पवार यांना फुले पगडी, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन ‘लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा’ हा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री शाहू शहाजी छत्रपती महाराज यांनी भटक्या- विमुक्तांना अजूनही जातीचे व जमिनीचे दाखले मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याची खंत व्यक्त केली. सर्व जमातींनी एकत्र येत काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अन्याय करणाऱ्या शक्तींविरोधात मशाली पेटवा : शरद पवार
भटके- विमुक्तांना अजूनही सामाजिक शोषणातून पाहिजे तशी मुक्ती मिळालेली नाही. संघटित शक्ती हीच तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देऊ शकते. त्यामुळे आपल्यावर अन्याय करणाऱ्या शक्तींविरोधात एकसंध होऊन मशाली पेटवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
धर्मसत्ता उलथून लावा : यशवंत मनोहर
-या देशात धर्मकारण व भ्रष्टाचारकारण सुरू आहे. हे संविधानविरोधी सुरू आहे. त्यामुळे देशातील संविधानविचारी व लोकशाहीनिष्ठ लोकांनी एकत्र यावे. या परिस्थितीविरोधात आंदोलन व्हावे व ही धर्मसत्ता उलथून लावावी, असे आवाहन डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. या देशात बाहेरून आलेल्या उपऱ्यांनी भटक्या-विमुक्तांना उपरे ठरवले. सत्तापिपासूंनी आपल्याला भटके ठेवले. आपण या देशाचे खरे मालक आहोत. त्यामुळे जमेल तेवढे शिक्षण घ्या, एकत्र या व सत्ता काबीज करा, असे आवाहनही त्यांनी केेले.