लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेली दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची तोफ १० जून रोजी धडाडणार आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा समारोपही होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने भुजबळ यांचे पहिल्यांदा जाहीर सभेत सार्वजनिक दर्शन घडणार आहे.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. या वेळी पटेल म्हणाले, भुजबळ यांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पुण्याच्या सभेत भुजबळ भाजपावर हल्लाबोल करतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुजबळ व धनंजय मुंडे हे ओबीसी चेहरे आहेत. भुजबळ बाहेर आल्यामुळे मुंडेंना अधिक ताकद मिळेल. हे दोन्ही नेते राष्ट्रवादीला अधिक बळकट करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतेच जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ते पक्षातील सुशिक्षित व सर्वमान्य असे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा पक्षाला फायदा होईल. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदी चार वर्षे झाली होती. ते लोकसभेची तयारी करीत आहेत. त्यामुळे त्यांना मतदारसंघ बांधणीसाठी वेळ हवा होता, असेही त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र येत भाजपाचा पराभव करतील. तसेही प्रत्येक राज्यात विरोधकांच्या भाजपा विरोधी आघाड्या तयार होत आहे, असेही त्यांनी सांगितले.२०१९ मध्ये लोकसभा लढणार२०१९ मध्ये भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघातून मी किंवा माझी पत्नी वर्षाबेन पटेल निवडणूक लढणार आहे. आपण कार्यकर्त्यांना तशी सूचना दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.