अद्ययावत पोलीस भवनाचे रविवारी भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:41 PM2018-03-23T23:41:58+5:302018-03-23T23:42:08+5:30
मॉडल आॅफ द स्टेट ठरू पाहणाऱ्या अद्ययावत पोलीस भवनाची निर्मिती पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात होणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सकाळी १०.३० वाजता पार पडणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मॉडल आॅफ द स्टेट ठरू पाहणाऱ्या अद्ययावत पोलीस भवनाची निर्मिती पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात होणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी सकाळी १०.३० वाजता पार पडणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत राहणार आहेत. या प्रसंगी नागपूर शहरात यापूर्वी पोलीस आयुक्त म्हणून सेवा देणारे अधिकारीही उपस्थित राहतील. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आज शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, प्रशासनाचे उपायुक्त रवींद्र परदेशी आणि गुन्हेशाखेचे उपायुक्त संभाजी कदम उपस्थित उपस्थित होते.
पाच परिमंडळ आणि ३० पोलीस ठाण्याचा व्याप असलेल्या नागपूर पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, प्रशासन आणि वाहतूक शाखा तसेच त्यांच्या उपायुक्तांची स्वतंत्र कार्यालये आहेत. शिवाय प्रत्येक परिमंडळांतर्गत दोन सहायक पोलीस आयुक्तांची स्वतंत्र वेगवेगळी कार्यालये आहेत. या सर्वांच्या बसण्याची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्यामुळे संबंधितांना वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करावी लागते. त्याचा विपरीत परिणाम कामकाजावर होतो. वेळही जातो. त्यावर उपाय म्हणून सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावी, अशी कल्पना होती. सध्याची पोलीस आयुक्तालयाची इमारत त्यासाठी अपुरी पडत असल्याने नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार सहा मजल्याची सर्व सोयीसुविधांयुक्त इमारत निर्माण करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त,सहपोलीस आयुक्त,अतिरिक्त आयुक्त, सर्व शाखांचे उपायुक्त आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय या एकाच इमारतीत असतील. त्याशिवाय पोलीस नियंत्रण कक्ष आणि ट्रॅफिक कंट्रोल युनिट, सीसीटीव्ही कॅमेरा कंट्रोल रूम, सायबर सेल आदींचीही सुविधा या ठिकाणी असणार आहे. नवीन इमारत जुन्या इमारत परिसरातच निर्माण करण्यात येणार असून बांधकामाचा खर्च ९९ कोटी प्रस्तावित होता. त्याकरिता विविध बांधकाम कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या.
सर्वांत कमी ८९ कोटी रुपयांची निविदा बी. एस. मेहता कंपनीची असून त्यांना हा कंत्राट देण्यात आला. या कंपनीला दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करायचे आहे. ही इमारत पूर्णत: पर्यावरण निकषांवर आधारित राहणार असून येथे सौरउर्जेचा वापर करण्यात येणार आहे. त्याशिवाय इमारतीमध्ये कॅफेटेरिया, व्यायाम शाळा आदी सुविधा असतील, अशीही माहिती पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्याच्या आयुक्तालयाच्या परिसरातील ५४ वृक्ष नवनिर्मित इमारतीच्या उभारणीसाठी कापले जातील. त्याबदल्यात आयुक्तालय तसेच पोलीस लाईन टाकळी परिसरात ३०० वृक्षांची लागवड करून पाच वर्षे त्यांचे संगोपन करण्यात येईल. ही जबाबदारी कंत्राटदार कंपनीची आहे, अशी माहितीही एका प्रश्नाच्या उत्तरात देण्यात आली. एकाच ठिकाणी सर्व पोलीस अधिकाºयांची तसेच घटकांची कार्यालये असल्यामुळे जनतेला सोयीचे होईल. तसेच घटनास्थळी पोहचण्याचा पोलिसांचा रिस्पॉन्स टाइम कमी होईल, असे यावेळी महानिरीक्षक दीपक पांडे म्हणाले.
एकच नियंत्रण कक्ष!
शहर पोलीस तसेच ग्रामीण पोलिसांकरिता एकच नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याकरिता मुंबईमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सॉफ्टवेअर तसेच अत्याधुनिक उपकरणासह यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. त्याकरिता ११२ हा हेल्पलाईन क्रमांक विकसित करून नागपूर शहर आणि ग्रामीणमधून येणारे दूरध्वनी व भ्रमणध्वनीची आॅनलाईन वर्गवारी करण्यात येईल.