रस्ते अपघात मोठी समस्या

By Admin | Published: January 2, 2017 02:40 AM2017-01-02T02:40:58+5:302017-01-02T02:40:58+5:30

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रस्ते अपघाताबाबत गंभीर चिंता व्यक्त करून देशात दरवर्षी पाच लाख अपघात

Big road accident problems | रस्ते अपघात मोठी समस्या

रस्ते अपघात मोठी समस्या

googlenewsNext

नितीन गडकरी यांची चिंता : वाहतूक नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रस्ते अपघाताबाबत गंभीर चिंता व्यक्त करून देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती दिली.
पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अ‍ॅन्ड ह्युमन रिसोर्सेस नागपूरच्या जननी सेहत अभियानाचा गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गडकरी यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे व इन्स्टिट्यूटच्या जननी सेहत रथाचे लोकार्पणही गडकरी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
गडकरी पुढे म्हणाले, बहुतेक अपघात निष्काळजीपणामुळे होतात. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. कुणी दारू पिऊन वाहन चालवितो तर, कुणी वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असतो. याशिवाय बोगस परवाने मिळविणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवरील ३८ अपघातग्रस्त स्थळांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे काम सुरू झाले आहे.
गडकरी यांनी स्वत:च्या अपघाताचा अनुभव सांगितला. कार अपघातात पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे दोन वर्षे निष्क्रिय पडून राहावे लागले. यात संपूर्ण कुटुंब भरडल्या गेले असे त्यांनी सांगून नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले. सध्या संपूर्ण आकाश फाटले आहे. ते शिवण्याची आपली क्षमता नाही. तरीपण दिव्याप्रमाणे तेवत राहून कार्य करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार विकास कुंभारे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, चित्रपट दिग्दर्शिका समृद्धी पोरे, आयटी तज्ज्ञ पल्लवी मोहन, उद्योजक रामाकृष्णन राममूर्ती, माजी महापौर अर्चना डेहनकर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, इन्स्टिट्युटचे डॉ. विरल कामदार, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

गोरगरिबांमध्ये देव
खायला अन्न, घालायला कपडे व राहायला घर नाही अशा गोरगरीब लोकांना देव माणून त्यांची सेवा केली पाहिजे अशी पं. दीनदयाल उपाध्याय यांची भूमिका होती. संत तुकाराम यांनीही हाच संदेश दिला होता. हा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून वाटचाल करीत आहे. काही दिवसांपूर्वी अनेक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवांसह आवश्यक साहित्यांचे वितरण केले. त्यावेळी झालेला आनंद हा निवडणूक जिंकल्यानंतर व मंत्रिपद वाट्याला आल्यानंतर झालेल्या आनंदापेक्षा मोठा होता असे गडकरी यांनी सांगितले.


स्तन कर्करोगाविरुद्ध लढा
स्तन कर्करोगाचे निदान वेळेत व्हावे यासाठी जननी सेहत अभियान सुरू करण्यात आले आहे. गडकरी यांनी याविषयावरही विचार व्यक्त केले. महिला स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक नाहीत. स्तनांमधील गाठींकडे दुर्लक्ष केले जाते. ही गाठ कर्करोगाची असल्यास वेळेवर निदान होणे आवश्यक असते. अन्यथा महिलेचे प्राण वाचू शकत नाही. महिलांनी स्तन कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे. येणाऱ्या काळात जिल्ह्यामध्ये एकाही महिलेचा मृत्यू स्तन कर्करोगाने व्हायला नको असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Big road accident problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.