मोबाईल्ससाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात पोलिसांचं सर्वात मोठं ‘सर्च ऑपरेशन’
By योगेश पांडे | Published: September 7, 2022 09:56 AM2022-09-07T09:56:49+5:302022-09-07T09:58:07+5:30
दीडशेहून अधिक पोलीस या कारवाईत सहभागी झाले असून कारागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मोबाईल व अंमली पदार्थांचा शोध सुरू आहे.
नागपूर - मोक्काच्या आरोपी नागपूर मध्यवर्ती कारागृहात गांजा आणि मोबाईलची बॅटरीज घेऊन जाताना आढळल्यानंतर पोलीस प्रशासनाने पहाटेपासून तेथे ‘सर्च ऑपरेशन’ राबविले आहे. दीडशेहून अधिक पोलीस या कारवाईत सहभागी झाले असून कारागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मोबाईल व अंमली पदार्थांचा शोध सुरू आहे. मागील काही काळातील पोलिसांचे हे कारागृहातील सर्वात मोठे ‘सर्च ऑपरेशन’ आहे हे विशेष.
खापरखेडा येथे राहणारा सूरज कावळे (वय २२) या कुख्यात गुन्हेगाराची सोमवारी न्यायालयात हजेरी होती. शहर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी सूरजला कारागृहातून मोक्का न्यायालयात नेले. तेथील कार्यवाही संपल्यानंतर त्याला तुरुंगात आणण्यात आले. दुपारी अडीच वाजता पोलीस कर्मचारी सूरजला घेऊन कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले. सूरजकडे कागदपत्रांच्या फायली होत्या. त्यांची तपासणी केली असता त्यात ५१ ग्रॅम गांजा आणि १५ मोबाईल बॅटरी लपवून ठेवल्या होत्या. त्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती.
या प्रकरणात सहभागी असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली असून आश्चर्याची बाब म्हणजे यात एक निलंबित पोलीस उपनिरीक्षक सूत्रधार असून त्यानेच मोबाईल-गांजा आणण्यासाठी आरोपीच्या भावाला पैसे दिले होते. या प्रकरणात हलगर्जी दाखविल्यामुळे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, कारागृहात मोबाईल्स असल्याची बाब यातून स्पष्ट झाली होती. त्याच्याच शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिसांचा ताफा कारागृहात पोहोचला. पहाटेपासूनच शोध सुरू असून कारागृहातील कैद्यांचीदेखील तपासणी सुरू आहे.