लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बायोमेडिकल वेस्टची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने वर्धमाननगर येथील रेडियन्स हॉस्पिटलला मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस) ५० हजाराचा दंड ठोठावला. हॉस्पिटलच्या मनमानी कारभारासंदर्भात उपमहापौर मनिषा धावडे यांच्याकडे तक्रार आली होती. लकडगंज झोनच्या सहायक आयुक्त साधना पाटील, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह धावडे हॉस्पिटलमध्ये पाेहचल्या. त्यांच्या उपस्थितीत एनडीएसचे झोन लीडर सुधीर सुडके यांनी हॉस्पिटलचे डॉ. मनोज पुरोहित यांना दंडाची पावती दिली.
एनडीएस पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागपूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, बाजारपेठ बंद होत्या. एनडीएसच्या पथकांनी ६४ प्रतिष्ठान, कार्यालयांची तपासणी केली.
एक लाखाचा दंड वसूल
धरमपेठ झोनअंतर्गत सीताबर्डी येथील एस.एल. सेल्सवर ५ हजाराचा दंड ठोकला. गांधीबाग झोनअंतर्गत अग्रसेन चौक येथील इंडियन ट्रेडर्सला ५ हजार, ए.जे. उद्योगाला ५ हजार, मंगळवारी झोनअंतर्गत सदर येथील कपिल ज्वेलर्स यांच्यावर १० हजार दंड आकारला. अचरज टॉवर येथील भव्य इन्फ्रास्ट्रक्चरला १० हजार, ग्रीप्स दी सलूनला ५ हजार, मानकापूर चौकातील सुनील हरयानी धान्य भांडारला १० हजार दंड केला. यासह अन्य प्रतिष्ठानांकडून एक लाख रुपये दंड वसूल केला.