नागपूर : नागपूर तालुक्यातील वारंगा या गावातील 23 कोंबड्यांचे नमुने बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्यानंतर या गावातील 460 कोंबड्यांना ठार मारण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.
वारंगा गावातील 23 कोंबड्या मृत झाल्या होत्या. त्यांचे नमुने 14 जानेवारीला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. सोमवारी रात्री साडेदहा वाजता कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकार्यांच्या परवानगीनंतर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता पशुसंवर्धन विभागाचे पथक वारंगा गावाकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांनी एक किलोमीटर परिसरातील 460 कोंबड्या ठार मारण्याची कारवाई सुरू केली आहे.
यासोबतच गडचिरोली शहरातील 15 कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सोमवारी रात्री आल्याने तेथेही एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.