लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बर्ड फ्लू हा कोंबड्यांना होणारा विषाणूजन्य संसर्गित आजार असून, तो झपाट्याने पसरतो. त्यामुळे या काळात कशी काळजी आणि खबरदारी घ्यावी, यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने मार्गदर्शनपर सूचना केल्या आहेत.
हा आजार परसातील कोंबड्या, अंड्यांसाठी असलेल्या कोंबड्या तसेच मांसल कोंबड्या व इतर पक्ष्यांना विष्ठा किंवा पक्ष्यातील द्रव संसर्ग यातून साथीच्या स्वरूपात परिसरात झपाट्याने पसरू शकतो. त्यामुळे स्वच्छता आणि सुरक्षा हाच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आहे.
आपल्या गावात किंवा परिसरात जंगली पक्षी तसेच कावळे, चिमण्या, स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळल्यास त्याची माहिती त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावी. शेतकरी किंवा नागरिकांनी त्यांच्या परसबागेत पाळलेल्या कोंबड्या व अन्य पक्षी किंवा कुक्कुटपालनातील व्यावसायिक पक्षी यांच्या आरोग्याची निगराणी ठेवावी. त्याची नोंद नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे करावी. पक्ष्यांचे संक्रमण रोखण्यासाठी खाद्य, पाणी इत्यादी गोष्टी करणाऱ्याने वैयक्तिक स्वच्छता राखावी. वैयक्तिक संसर्गापासून व्यक्तींनी बचाव करण्याकरिता साबणाचा वापर करावा. हात धुण्यासाठी निर्जंतुकीरणाचे द्रव्य वापरावे.
कोंबड्यांचे खुराडे, खाद्य तसेच भांडी निर्जंतूक करण्यासाठी दोन टक्के सोडियम हायड्रॉक्साइड किंवा चार टक्के फॉरमॉलिनचा वापर करावा. त्याची फवारणी करून घ्यावी. आपल्या फार्मवर बाहेरील व्यक्ती किंवा वाहनांना प्रतिबंध करावा. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने सुरक्षा प्रणालीचा वापर करावा. कोंबडीचे मांस आणि अंडी यांचा वापर शिजवून किंवा उकळून करण्यात येतो. त्यामुळे आहारात वापर करण्यासंदर्भात नागरिकांनी भीती बाळगू
नये, असेही स्पष्ट केले आहे.
अशी असतात लक्षणे
आजारी कोंबड्या मोठ्या प्रमाणात मरतूक होतात. आजारी कोंबड्यांना श्वसनाचा त्रास होतो. पक्षी मलूल आणि निस्तेज होतात. विष्ठा पातळ होते. संसर्गित पक्ष्यांच्या नाकातून चिकट स्राव येतो, तसेच पक्ष्यांचे तुरे आणि गलोल निळे पडतात व पक्ष्यांचा चेहरा सुजलेला दिसतो.
मर आढळल्यास हे करा
बागेतील कोंबड्या किंवा व्यावसायिक फार्मवर पक्षी मृत आढळल्यास निरोगी कोंबड्या त्यापासून लांब ठिकाणी निरीक्षणात ठेवाव्यात. तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांना सूचना द्यावी, या अधिकाऱ्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंद ठेवावी.
...