“लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पण जयंत पाटील कुठेत?”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:28 AM2024-04-06T11:28:03+5:302024-04-06T11:29:17+5:30
Devendra Fadnavis News: जयंत पाटील हे त्यांच्या पक्षावर खूप नाराज आहेत. त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने ४५ हून अधिक जागांचे लक्ष्य ठेवले आहे. तर महाविकास आघाडीकडून भाजपासह महायुतीला चीतपट करण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दिग्गज नेते प्रचार, बैठका, कार्यकर्ता मेळावे यांच्या माध्यमातून कंबर कसून तयारीला लागल्याचे दिसत आहेत. मात्र, यातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, जयंत पाटील कुठे आहेत, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
भाजपाच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जयंत पाटील हे त्यांच्या पक्षावर खूप नाराज आहेत. त्यांच्या पक्षातच त्यांना कुणी विचारत नाही. एवढी मोठी निवडणूक सुरू आहे. पण, जयंत पाटील तुम्हाला कुठे दिसत आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार हेच दिसत आहेत. जयंत पाटील आहेत कुठे? समजदार को इशारा काफी हैं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
इंडिया किंवा महाविकास आघाडीला डबे नाहीतच, फक्त इंजिन
महाविकास आघाडीत धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो यांचे वर्णन कुणीतरी चांगले केले आहे. हे फक्त इंजिन आहे, त्यांना डबेच नाहीत. त्यामुळे इंजिनमध्ये बसायची जागा नाही. प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने जात आहे. आम्ही एकत्र आहोत, असे हात वर करून दाखवायचे आणि पुन्हा विरुद्ध दिशेला जायचे. ही इंजिन काय कामाची, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, तीन पक्ष सोबत आहेत. मित्र पक्षांचा सन्मान राखणे महत्त्वाचे आहे. ३३ जागा आम्ही लढू, असा दावा आम्ही कधीच केला नव्हता. आमचा प्रयत्न होता की, तिघांचा सन्मान राखून ज्या जागा मिळतील, त्या जागा आपण लढल्या पाहिजेत. त्यामुळे ज्या जागा मिळतील, त्यावर आम्ही समाधानी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.