नागपूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणतात, माझी पॉवर माहीत नाही का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:15 AM2018-06-11T10:15:51+5:302018-06-11T10:15:58+5:30
‘तुझ्या मित्राला (अक्षय) बऱ्या बोलाने तिच्याबाबत माहिती द्यायला सांग, अन्यथा गुंडांमार्फत त्याला संपवून टाकेन. कुणाला काही पत्ता पण चालणार नाही तो कुठे गेला ते...’ अशी थेट धमकी नागपूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पळून गेलेल्या प्रेमीयुगुलाची त्यांच्या मित्रांना माहिती विचारण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. ‘तुझ्या मित्राला (अक्षय) बऱ्या बोलाने तिच्याबाबत माहिती द्यायला सांग, अन्यथा गुंडांमार्फत त्याला संपवून टाकेन. कुणाला काही पत्ता पण चालणार नाही तो कुठे गेला ते...’ अशी थेट धमकी डॉ. पोतदार यांनी दिली. धमकीची ही ‘आॅडिओ क्लीप व्हायरल’ झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
प्रकरण कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एका व्यक्तीची २० वर्षीय मुलगी दुसऱ्या समजाच्या मुलासोबत आठ दिवसांपूर्वी निघून गेली. ती बेपत्ता असल्याची तक्रार कळमेश्वर ठाण्यात तिच्या कुटुंबीयांनी नोंदविली.
ती तरुणी ही तिच्या काकांकडे सावनेर येथे राहायची. तेथूनच ती प्रियकरासोबत निघून गेली. तिचा शोध घेऊनही ती गवसली नाही. ही कुणकुण लागल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता, बेपत्ता तरुण-तरुणीने लग्न केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी तिच्या वडिलांना सोबत घेऊन त्यांनी ज्यांच्यासमक्ष लग्न केले, त्यांच्याशी भेट घलून दिली. दोघेही भीतीपोटी समोर येत नसावे, अशी शक्यताही ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी व्यक्त केली. दोघेही सज्ञान असल्याने पोलीस या प्रकरणात काही करू शकत नाही, असे स्पष्ट केले.
दरम्यान, तरुण मुलीने हे पाऊल उचलल्याने अस्वस्थ झालेल्या तिच्या वडिलांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना माहिती दिली. डॉ. पोतदार यांनी त्याची लगेच दखल घेतली आणि तिच्याबाबत माहिती घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता तरुणीच्या प्रियकराचा मित्र कुणाल नामक मित्राला फोन केला. कुणालशी बोलतानाच त्याने दुसऱ्या काकाला फोन दिला. यावेळी डॉ. पोतदार यांनी बोलताना जी भाषा वापरली ती असंसदीय आहे. संबंधित तरुणांनी ती आॅडिओ क्लीप आपल्या मित्रांना तर त्यांनी दुसऱ्यांना पाठवली. ही क्लीप आज रविवारी सर्वत्र व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.
असे आहे संभाषण...
डॉ. पोतदार यांचे क्लीपमधील वक्तव्य असे, कुणाल, अक्षय आहे काय, तु कुठे आहे? मुलीबद्दल माहिती आहे का? अक्षयला बरोबर समजून सांग. इन्फर्मेशन नाही दिली त.... पोलीस. प्रायव्हेट गुंडे लावून देऊ. त्याची एैसीतैसी करून टाकू. काय आहे ते सांग म्हणा. पुरी इन्फर्मेशन दे म्हणा याला. दोन-चार गुंडे लावून देऊ. पता नाही चालणार कुठं जाईन त. प्रकरण आंगभर होऊन रायलं. मी एसपीशी बोललो. डीआयजीशी बोललो. समजलं काय. त्याले सांग पुरी माहिती दे म्हणून. त्यानंतर डॉ. पोतदार कुणालचे काका सुनील गिरी यांच्याशी बोलले. ‘मी धमकी नाही देऊन राहिलो, प्रत्यक्ष करून टाकणं, माहिती दे, फोन करायची गरज आहे. तुले माहीत नाही माझी पॉवर काय आहे त. एक फोन करायची गरज आहे. कुठं नेऊन मारपीट करतील अन् कुठं नेऊन टाकतील, पता नाही चालणार. तुला माहीत नाही माझी पॉवर काय आहे तं. माझे दुसरेही सोर्सेस आहे. पुरी माहिती दे म्हणा पीआयले, मी सांगतो ते ऐक फक्त’
तरुणीचे वडील भाजप कार्यकर्ता आहे. ती आठ दिवसांपासून बेपत्ता आहे. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने तिचे कुटुंबीय तणावात आहेत. तिचा शोध लागावा, यासाठी मी मुलाचा भाऊ, त्याचे मित्र, पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो. त्याच्या मित्राशी बोललो. जी ‘आॅडिओ क्लीप’ व्हायरल झाली ती जोडतोड केली आहे, हे विरोधकांचे काम आहे. मी पोलीस तपासात सहकार्य करीत आहे. दोघांनाही पोलिसांसमोर हजर करावे. आम्ही त्यांचे लग्न लावून द्यायला तयार आहोत.
- डॉ. राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष, भाजप, नागपूर (ग्रामीण)