नागपूर : भाजपने आपल्यावर गोवा प्रभारीची जबाबदारी सोपविली आहे. याचे मी स्वागत करतो. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलून त्यांना काय हवे त्यानुसार पुढची रणनीती ठरविली जाईल. पुन्हा एकदा जोमाने काम करून गोव्यात भाजपचे सरकार आणू, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
फडणवीस म्हणाले, गोव्याच्या चार निवडणुका आपण बघितल्या आहे. त्यामुळे आपल्यासाठी गोवा नवीन नाही. विकास आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गोवा निवडणूक लढविली जाईल. उत्तर प्रदेशच्या राजकारणात ब्राह्मण समाजाबरोबर इतर समाजाचे महत्त्व आहे. भाजपने सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले आहे. उत्तर प्रदेशातही भाजप विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.
बेळगाव महापालिकेत मराठी माणसांचा पराभव झाला नाही, तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे, अशी बोचरी टीका करीत भाजपचे १५ मराठी नगरसेवक निवडून आले असल्याचेही त्यांनी सांगितले. चिपी विमानतळाच्या विकासात नारायण राणे यांचे योगदान कोणी नाकारू शकत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.