नागपूर : मंत्रिपदाच्या बदल्यात पैशांची मागणी करणाऱ्या महाठग नीरज सिंग राठोड याच्या अटकेमुळे एका मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड झाला आहे. ही घटना ताजी असतानाच भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनीदेखील त्यांना अशाच पद्धतीने पैसे मागण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. मात्र पैसे मागणारा राठोड नसून शर्मा नावाचा व्यक्ती होता असे त्यांनी सांगितले आहे.
खोपडे यांनी केलेल्या दाव्यानुसार मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना सहा ते सात महिन्यांअगोदर शर्मा नावाच्या व्यक्तीचा दिल्लीहून त्यांना फोन आला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मंत्रिपदासाठी तुमच्या नावाला स्वीकृती दिली असून तुम्ही ते स्वीकारावे असे शर्मा म्हणाला होता. दिल्लीतून ज्या सूचना येतील त्यांचे पालन करावे लागेल,असे सूचक वक्तव्य देखील त्याने केल्याचे खोपडे यांनी सांगितले. मात्र भाजपमध्ये मंत्रीपदासाठी अशा पद्धतीने पैसे मागण्यात येत नसल्याने मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा तीन ते चार वेळेस फोन आला मात्र मी त्याला अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने त्याने नंतर फोन करणे बंद केले.
मी आमदार विकास कुंभारे व राठोड यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप ऐकली. त्यातील राठोड याचा आवाज मला फोन करणाऱ्या शर्मा पेक्षा निश्चितच वेगळा होता, असा दावा खोपडे यांनी केला आहे. खोपडे यांच्या या दाव्यामुळे आता पोलीस त्या दिशेनेदेखील तपास करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे