नागपूर : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना बुधवारी भाजप, बसपा आणि मनसे उमदेवारांनी अर्ज भरताना जोरदार श्ािक्तप्रदर्शन केले. वाजत गाजत मिरवणुकीने उमेदवार आले. त्यांच्या समर्थकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.भाजपचे उमेदवार हे संविधान चौकातून मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार होते. संविधान चौकात सकाळी १०.३० वाजेपासून कार्यकर्तेही गोळा झाले. मिरवणूक निघणार परंतु त्यापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि सुधाकर देशमुख यांनी अर्ज भरले. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, खा. अजय संचेती, आ. अनिल सोले आणि फडणवीस यांच्या पत्नीसुद्धा उपस्थित होत्या. भाजपातर्फे डॉ. मिलिंद माने आणि आणि कृष्णा खोपडे एका खुल्या जीपवर मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले. या मिरवणुकीत देवेंद्र फडणवीस सुद्धा सामील झाले होते. पक्ष आणि उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. पक्षाचे झेंडे फडकवित कार्यकर्त्यांनी यावेळी एकच गर्दी केली होती.बहुजन समाज पार्टीचे उमेदवार किशोर गजभिये आणि सत्यभामा लोखंडे या सुद्धा आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी बसपा कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दुपारनंतर मनसेचे प्रशांत पवार अर्ज भरण्यासाठी आले. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. पवार सुद्धा मिरवणुकीनेच आले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने दुपारनंतर एकाच वेळी भाजप, मनसे आणि बसपाचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यामुळे गर्दी वाढली. तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हाती असलेल्या पक्षांच्या विविध रंगीत झेंड्यामुळे परिसर फुलून गेला होता. दरम्यान काही अपक्षांनी सुद्धा अर्ज भरले. उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक उमेदवार हे व्हिक्ट्रीचे चिन्ह दाखवून आपणच विजयी होऊ, असा दावा करीत होते. (प्रतिनिधी)
भाजप, मनसे, बसपाच्या मिरवणुका : कार्यकर्ते जोशात
By admin | Published: September 27, 2014 2:38 AM