भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा, आरक्षण निवडणूकीचा मुद्दाच नाही
By योगेश पांडे | Published: February 16, 2024 04:26 PM2024-02-16T16:26:31+5:302024-02-16T16:31:25+5:30
आरक्षणाच्या मुद्द्याकडे निवडणूकीच्या दृष्टीने पाहू नये व तो निवडणूकीचा मुद्दादेखील नाही, असा दावा त्यांनी केला. नागपुरात ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
योगेश पांडे , नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण परत तापले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याचा निवडणूकीशी काहीच संबंध नसल्याची भूमिका मांडली आहे. आरक्षणाच्या मुद्द्याकडे निवडणूकीच्या दृष्टीने पाहू नये व तो निवडणूकीचा मुद्दादेखील नाही, असा दावा त्यांनी केला. नागपुरात ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोणत्याही समाजाचे आरक्षण हा सामाजिक मुद्दा आहे. त्याचा राजकीय फायदा होईलच असे नाही. विविध समाजाच्या मागण्या सरकारला पूर्ण कराव्या लागतात. त्याकडे निवडणुकीच्या दृष्टीने बघू नये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, त्यामध्ये कोणताही दुसरा हेतु नाही, असे ते म्हणाले. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील दिलेल्या अहवालावर विशेष अधिवेशनात चर्चा होईल.
मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असे. मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण हे टिकणार असेल. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याने आता मनोज जरांगे पाटील यांची मागणी पूर्ण होणार असल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे व सरकारच्या भूमिकेचे स्वागत करावे, असेही ते म्हणाले.
अजितदादांचा उमेदवार बारामतीतून निवडून येणारच :
बारामतीच्या जागेवर महायुतीमध्ये एकमत होईल. अजित पवार बारामती लोकसभेतून जो उमेदवार देतील तो ६० टक्के मते घेऊन विजयी होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
नाना पटोले यांनी राहुल गांधींनी समजवावे :
ओबीसी आरक्षणाबाबत टीका करण्यापेक्षा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे नेते राहुल गांधी यांना समजावून सांगावे. राहुल गांधी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान करीत आहेत. कॉंग्रेसने ६५ वर्षांत कधीच ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांना राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र त्यावर ते काहीच बोलले नाहीत, त्यामुळे त्यांना ओबीसींविषयी बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.