नागपूर जिल्ह्यातील काटोल व रामटेकमध्ये भाजपच लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:44 AM2019-08-28T10:44:26+5:302019-08-28T10:46:14+5:30

नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि रामटेक मतदार संघात भाजपच लढेल असे सांगत भाजपचे प्रदेश महामंत्री आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवारी या दोन्ही मतदार संघातील नेत्यांना आश्वस्त केले.

BJP will fight in Katol and Ramtek in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील काटोल व रामटेकमध्ये भाजपच लढणार

नागपूर जिल्ह्यातील काटोल व रामटेकमध्ये भाजपच लढणार

Next
ठळक मुद्देकोअर कमिटीत झाले मंथनजिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजप-सेना युतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि रामटेक मतदार संघात भाजपच लढेल. २०१४ मध्ये या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या होत्या. जिंकलेल्या जागा सेनेला सोडण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत भाजपचे प्रदेश महामंत्री आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवारी या दोन्ही मतदार संघातील नेत्यांना आश्वस्त केले.
नागपूर जिल्ह्यातील (ग्रामीण) सहाही मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती भातखळकर यांनी मंगळवारी रविभवन येथे घेतल्या. मुलाखतीनंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. तीत जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जिल्ह्यातील चारही महामंत्री, आमदार आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत काटोल, रामटेक आणि सावनेर मतदार संघाबाबत पक्षाची काय भूमिका आहे, जागावाटप कसे होईल, असा सवाल काही पदाधिकाऱ्यांनी भातखळकर यांना विचारला असता २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार जिथे विजयी झाले, त्या जागा भाजपच लढेल. यासोबतच जिथे शिवसेनेचे उमेदवार जिंकले असेल त्या जागा शिवसेना लढेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काटोल, रामटेकवर सेनेचा दावा असला तरी या दोन्ही जागा भाजपच लढणार असल्याचे संकेत भातखळकर यांच्याकडून मिळाल्याने येथील इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, भातखळकर यांनी दुपारी जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. काटोल मतदार संघातून विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर, माजी पंचायत समिती सभापती संदीप सरोदे, माजी जिल्हा परिषद सभापती उकेश चव्हाण, पक्षात नव्यानेच दाखल झालेले प्रवीण लोहे, श्यामराव बारई, मनोज कोरडे, दिलीप ठाकरे, अ‍ॅड. दीपक केणे यांनी मुलाखती दिल्या.
जिल्ह्यात भाजपमध्ये दावेदारांची सर्वाधिक संख्या सावनेर मतदार संघात आहे. येथे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर, सोनबा मुसळे, अ‍ॅड. प्रकाश टेकाडे, जिल्हा महामंत्री संजय टेकाडे, दिलीप जाधव, रामराव मोवाडे, किशोर मुसळे, अशोक तांदुळकर, राजेश जीवतोडे, अशोक धोटे आदींनी मुलाखती दिल्या.
उमरेड मतदार संघात आमदार सुधीर पारवे, डॉ. शिरीष मेश्राम, प्रतिभा मांडवकर, अरविंद गजभिये, आनंद खडसे मुलाखतीला हजर होते. रामटेक मतदार संघातून आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, अविनाश खळतकर, कमलाकर मेंघरे, योगेश वाडीभस्मे, संजय मुलमुले, राजेश ठाकरे, विजय हटवार, रामभाऊ दिवटे यांनी मुलाखती दिल्या.
काटोल, रामटेक, उमरेड आणि सावनेर मतदार संघात इच्छुकांची संख्या मोठी असली तरी, कामठी आणि हिंगणा मतदार संघातील मुलाखतीदरम्यान तसे घडले नाही. कामठीत भाजपकडून विद्यमान आमदार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि हिंगण्यात आ. समीर मेघे प्रबळ दावेदार आहेत.

कळमेश्वर, काटोल लक्ष्य
२०१४ च्या निवडणुकीत काटोल मतदार संघ भाजपने राष्ट्रवादीकडून हिसकावला. येथे आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला. आमदारकीची टर्म पूर्ण होण्यापूर्वीच आशिष देशमुख यांनी भाजपला रामराम करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या जागेवर सेनेने प्रबळ दावा ठोकला आहे. असे असले तरी युतीत ही जागा भाजपाच्या वाट्याला येणार असल्याचे संकेत भातखळकर यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे काटोलची जागा जिंकण्यासाठी या बैठकीत अ‍ॅक्शन प्लान निश्चित करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. जिल्ह्यात सावनेरची एकमेव जागा काँग्रेसकडे आहे. २०१४ मध्ये येथे ऐनवेळी भाजपचे सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे रद्द झाला होता. त्यामुळे सेना येथे दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे सावनेरबाबतचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेतील, अशी माहिती आहे. मात्र सावनेरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे या बैठकीत निश्चित झाल्याचे कळते.

हौसे-गवसेही मुलाखतीला
जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील निवडक इच्छुकांना पक्षाकडून मुलाखतीला बोलावण्यात आले होते. जिल्हाध्यक्षांनी प्रदेश भाजपकडून आलेल्या यादीनुसार संबंधित उमेदवारांना मुलाखतीला निमंत्रितही केले होते. मात्र वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेत पक्षातील हौसे-गवसे उमेदवारही मुलाखतीला हजर झाले. त्यामुळे रविभवन येथे नियोजित वेळापत्रकानुसार मुलाखतीला विलंब झाला. मुलाखतीच्या स्थळी निमंत्रित उमेदवारापेक्षा नवे चेहरे दिसून आल्याने काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. भातखळकर यांनी या नवख्या दावेदारांनाही मुलाखतीसाठी संधी दिली.

Web Title: BJP will fight in Katol and Ramtek in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.