लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या ओबीसी आघाडीच्या वतीने संविधान चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे व ओबीसी आघाडीचे अध्यक्ष रमेश चोपडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथीनिमित्त प्रारंभी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केले. महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीचे हे अपयश आहे, असा आरोप यावेळी भाजपतर्फे लावण्यात आला. लवकरात लवकर आरक्षण मिळाले नाही तर ओबीसी समाजाचे मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रकाश टेकाडे, घनश्याम खवले, नरेश बरडे, शंकरराव चौधरी, दशरथ मस्के, विनोद बांगडे, कमलेश चकोले, रामभाऊ आंबुलकर, उपमहापौर मनीषा धावडे, अविनाश ठाकरे, रवींद्र चव्हाण, भोजराज डुंबे, संजय अवचट, संजय चौधरी, नितीन गुडधे प्रामुख्याने उपस्थित होते.