लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमतने सुरू केल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत राज्यस्तरीय रक्तसंकलन अभियानात राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. विविध संस्था, संघटना व नागरिक या अभियानात उत्स्फुर्ततेने सहभागी होत आहेत. बुधवारी १४ जुलै रोजी शताब्दी बहुद्देशीय संस्था-कोराडी, डॉ. बाबासाहेब हेल्थ ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन या संस्थांच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन लोकमतने केले आहे.
शताब्दी बहुद्देशीय संस्था
शताब्दी बहुउद्देशीय संस्था, महादुला यांच्या संयुक्त विद्यमाने कोराडी येथील संघदिप बौद्ध विहारात सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजक रत्नदीप रंगारी, संजय रामटेके यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वतीने बुधवारी दुपारी १२ ते ४ वाजताच्या दरम्यान जीएमसी ब्लड बँक, दुसरा मजला, हॉस्पिटल बिल्डिंग, जीएमसी, नागपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. त्रिशला ढेमरे, सचिव डॉ. निकेतन जांभूळकर, डॉ. नितीन शेंडे, डॉ. मुकेश वाघमारे यांनी केले आहे.
महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वतीने बुधवारी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सभागृह, ए विंग, दुसरा मजला, तेलंगखेडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रादेशिक उपसंचालक मंगेश चौधरी यांनी केले आहे.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता अजनी रेल्वे इन्स्टिट्यूट, अजनी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे व अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुप कुमार सत्पथी यांच्या हस्ते होईल. शिबिरात रेल्वे कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युनियनचे ई.व्ही. राव यांनी केले आहे.
नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस
नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पसच्यावतीने बुधवारी सकाळी १० वाजता युनिव्हर्सिटी कॅम्पस हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात नागरिक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
............