लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ३१ ऑक्टोबरला चंद्र मेष राशीत ७ अंश ११ कला व २४ विकलावर राहणार असून त्याचे पूर्ण दर्शन होणार आहे. साधारणत: दर महिन्यात एकदाच पूर्ण चंद्र दिसतो. परंतु, ऑक्टोबर महिन्यात दोनदा हा योग आला आहे. २ ऑक्टोबरनंतर ३१ ऑक्टोबरला हा योग येत आहे. ज्यावेळी एकाच महिन्यात दोनदा असे पूर्ण चंद्र दर्शन होते, त्यावेळी दुसऱ्या पूर्ण चंद्र दर्शनाला ब्ल्यू मून दर्शन असे म्हणतात, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.३० जून २००७ ला अशी घटना घडली होती. ३१ ऑक्टोबरनंतर असा योग आता थेट ३० सप्टेंबर २०५० ला येईल. अर्थात ३१ जानेवारी व ३१ मार्च २०१८ ला आपण ब्ल्यू मून बघितला होता. अशा रितीचा ब्ल्यू मून ज्योतिषशास्त्रानुसार ३१ ऑगस्ट २०२३ ला बघता येईल, असेही डॉ. वैद्य सांगतात. उगवणारा चंद्र खरेतर लालसर रंगाचा असतो. परंतु चंद्र जेव्हा क्षितिजापासून भ्रमण करताना अधिक उंचावर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तित प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात यावेळी करड्या छटा मिसळल्यामुळे तो निळसर भासू लागतो. मात्र ब्ल्यू मून व्याख्येचा व त्याच्या रंगाचा काहीही संबंध नाही.या ब्ल्यू मून प्रसंगामुळे 'वन्स इन अ ब्ल्यू मून' असे म्हणण्याची प्रथा १७ व्या शतकापासून सुरू झाली, अशी माहिती डॉ. अनिल वैद्य यांनी दिली. प्रत्येकाने ब्ल्यू मून पर्वणीचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
३१ ऑक्टोबरला रात्री ८.१० वाजता नागपुरात दिसणार 'ब्ल्यू मून'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:39 PM