लोकमत न्यूज नेटवर्क
नागपू : शहरात बनावट कागदपत्र तयार करणारे रॅकेट सक्रिय असून तहसील कार्यालयात उत्पन्नाचा बनावट दाखला तयार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणी तहसील कार्यालयाकडून सदर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जात, उत्पन्न, शपथपत्रासह विविध प्रमाणपत्र देण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्र, तहसील कार्यालायसह आपले सरकार केंद्रामार्फत हे तयार केले जाते. या प्रमाणपत्रावर नायब तहसीलदार, तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी यांचा सही, शिक्का असतो. शासकीय कामासाठी हे महत्वाचे कागदपत्र आहे. यासाठी शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. हे कागदपत्र तयार करून देण्यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दलालाही सक्रिय आहेत. या कागदपत्रांची इतर शासकीय कार्यालयामार्फत उलटतपासणी फारच कमी वेळा होते. याचा फायदा दलालांकडून घेत संपूर्ण कागदपत्रच बनावट तयार करण्यात येते. या कागदांवर सही, शिक्केही बनावट असतात. मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार यांच्याकडे उत्पन्नाचे दाखले बनावट असल्याच्या काही तक्रारी आल्या. याची तपासणी केली असता यातील एक प्रमाणपत्र कार्यालयातून तयार करण्यात आले नसून सही, शिक्केही बनावट असल्याचे लक्षात आले. याची गांभीर्याने दखल घेत पोलिसात तक्रार करण्याचे आदेश तहसीलदार यांनी नायब तहसीलदार यांना दिल्याची माहिती आहे.