‘व्हीएनआयटी’ सोबत ‘बोईंग’ करणार करार?

By Admin | Published: October 16, 2015 03:24 AM2015-10-16T03:24:40+5:302015-10-16T03:24:40+5:30

शैक्षणिक क्षेत्राला उद्योगांसोबत थेट जोडता यावे यासाठी देशभरातील मोठ्या संस्थांमध्ये पुढाकार घेण्यात येत आहे.

'Boing' agreement with VNIT? | ‘व्हीएनआयटी’ सोबत ‘बोईंग’ करणार करार?

‘व्हीएनआयटी’ सोबत ‘बोईंग’ करणार करार?

googlenewsNext

तयारीला वेग : दिनेश केसकर आज नागपुरात
नागपूर : शैक्षणिक क्षेत्राला उद्योगांसोबत थेट जोडता यावे यासाठी देशभरातील मोठ्या संस्थांमध्ये पुढाकार घेण्यात येत आहे. नागपुरातील ‘व्हीएनआयटी’देखील यात अग्रेसर असून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी ‘बोर्इंग’सोबत सामंजस्य करार करण्याची संस्थेची तयारी सुरू आहे. यासंदर्भात ‘बोर्इंग’कडूनदेखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून शुक्रवारी कंपनीचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष व ‘बोर्इंग इंडिया’चे अध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांच्यासोबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपुरातील ‘मिहान’च्या प्रगतीसाठी ‘बोर्इंग’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ‘बोईंग’ने एमआरओची उभारणी केली. दक्षिण-पूर्व आशियातील बोईंगच्या विमानांसाठी हा ‘एमआरओ’ सक्षम आहे. ‘बोईंग’ने हा ‘एमआरओ’ आता ‘एअर इंडिया’ला हस्तांतरित केला आहे. परंतु या हस्तांतरणाच्या अगोदरपासून ‘व्हीएनआयटी’सोबत सामंजस्य करारासंदर्भात ‘बोईंग’चा विचार सुरू होता. परंतु काही कारणांमुळे याचा मसुदा अंतिम होऊ शकला नव्हता. ‘व्हीएनआयटी’तर्फे आयोजित करण्यात येणारा तांत्रिक महोत्सव ‘अ‍ॅक्सिस’च्या उद्घाटनासाठी डॉ. दिनेश केसकर शुक्रवारी नागपुरात येणार आहेत. यावेळी या सामंजस्य करारासंदर्भात सखोल चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ. नरेन्द्र चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशा हालचाली सुरू असल्याच्या वृत्तास होकार दिला. अद्याप अंतिम मसुदा तयार झालेला नाही. परंतु यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. ‘बोर्इंग’ने ‘एमआरओ’ हस्तांतरित केला असला तरी त्यांचे काम जगभरात चालते. त्यामुळे संबंधित सामंजस्य करारावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल, असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

Web Title: 'Boing' agreement with VNIT?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.