लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाने विविध व्यवसायांवर प्रभाव पडला आहे. या भीतीचा सर्वाधिक परिणाम लग्नसोहळा आणि त्या प्रकारच्या कार्यक्रमांवर पडला आहे. खबरदारी म्हणून मंगल कार्यालय मालकांनीही मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बहुतेक मंगल कार्यालय मालकांनी राज्य शासनाच्या आदेशाला पाठिंबा दर्शविला.मंगल कार्यालय ओनर्स असोसिएशनचे सदस्य सत्यजित सरवटे यांनी प्रशासनाच्या आदेशाला मंगल कार्यालयांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. नागपूर शहरात जवळपास ५०० च्या आसपास लहानमोठी मंगल कार्यालये आणि लॉन्स आहेत. या सभागृहांमध्ये लग्न सोहळ्यांसह साक्षगंध, मौंज आदी कार्यक्रम होतात. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व मंगल कार्यालयांचे कार्यक्रम ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसे मार्च महिन्यात लग्नसोहळे कमीच असतात. या काळात साखरपुडा किंवा याप्रकारचे लहानसहान कार्यक्रम होतात. लग्नाची खरी धामधूम एप्रिल महिन्यापासून सुरू होते. मात्र मार्च महिन्यातील कार्यक्रमही स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान बुकिंग रद्द केले किंवा तारीख पुढे ढकलली किंवा आयोजकांच्या मागणीनुसार पैसेही परत दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कोरोना विषाणूचा फैलाव हा एकमेकांच्या संपर्कातून होतो. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास हा विषाणू सहज दुसऱ्याच्या शरीरात पोहचू शकतो. त्यामुळे एकमेकांचा संपर्क टाळा व गर्दीपासून दूर राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. लग्नसोहळ्यात हजारो लोकांची गर्दी होते आणि नातेवाईक व परिचितांना कार्यक्रमात येण्यापासून रोखताही येत नाही. अशावेळी लग्नसोहळ्यात आलेल्या एखाद्या बाधित व्यक्तीमुळे शेकडो लोकांना याची लागण होण्याचा मोठा धोका उद््भवू शकतो. त्यामुळे अनेक कुटुंबांनी मार्च महिन्यात आपले ठरलेले कार्यक्रम एकतर रद्द केले किंवा पुढे ढकलले आहेत. १९ मार्च हा मुहूर्ताचा दिवस मानला गेला होता व शेकडो कार्यक्रमही यादिवशी ठरले होते. मात्र कोरोनामुळे मंगल कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले. काही मंगल कार्यालयांमध्ये ३१ मार्चपर्यंत बुकिंग रद्द करण्यात आल्याचे बोर्ड लावले. बजाजनगर येथील एका लॉनमध्ये १९ मार्च रोजीचा एक लग्नसोहळा रद्द करण्यात आल्याचा बोर्ड झळकला.काहींचा बेजबाबदारपणा कायमबहुतेकांनी निर्देशाचे पालन केले, मात्र काहींचा बेजबाबदारपणा या परिस्थितीतही कायम होता. जगनाडे चौकातील एका मोठ्या मंगल कार्यालयात गुरुवारी एक कार्यक्रम पार पडला. बाहेरून बंद असल्याचे दाखविले, मात्र आतमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. बहुतेक पाहुणे गुपचूपपणे सभागृहात जात असल्याचे दिसून आले. या परिस्थितीतही असा नतद्रष्टपणा नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे.जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा नाहीलोकांच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा नाही. तशी मार्च महिन्यात लग्नाची धामधूम फार नसते. मात्र आम्ही स्वत: आलेले बुकिंग रद्द केले. ३१ मार्चपर्यंत कुठलेही कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती सुधारली नाही तर पुढेही कार्यक्रमांचे बुकिंग घेतले जाणार नाही. आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत.सत्यजित सरवटे, मंगल कार्यालय ओनर्स असोसिएशन
मंगल कार्यालयांचे बुकिंग मार्चपर्यंत रद्द : नागपुरातील सभागृहांमध्ये शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:42 AM
खबरदारी म्हणून मंगल कार्यालय मालकांनीही मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बहुतेक मंगल कार्यालय मालकांनी राज्य शासनाच्या आदेशाला पाठिंबा दर्शविला.
ठळक मुद्देबहुतेकांनी घेतली खबरदारी