जग बदलण्याची इच्छा निर्माण करतात पुस्तके : डॉ. नीलिमा चौहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:44 PM2019-12-14T23:44:20+5:302019-12-15T01:12:02+5:30
पुस्तकांमुळे जग बदलण्याची इच्छा आणि शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाच्या झाकीर हुसैन दिल्ली कॉलेज (सायं.) च्या सहायक प्राध्यापक व लेखिका डॉ. नीलिमा चौहान यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुस्तकांमुळे जग बदलण्याची इच्छा आणि शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाच्या झाकीर हुसैन दिल्ली कॉलेज (सायं.) च्या सहायक प्राध्यापक व लेखिका डॉ. नीलिमा चौहान यांनी व्यक्त केले.
प्रभा खेतान फाऊंडेशनच्यावतीने ‘कलम : अपनी भाषा अपने लोग’ या उपक्रमांतर्गत लोकमत आणि अहसास वूमन ऑफ नागपूर यांच्यावतीने हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित लेखक-पाठक संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाजातील स्त्रियांच्या अवस्थेबाबत त्यांनी रोखठोक विचार मांडले. महिलांना कौटुंबिक आणि नोकरीपेशा अशा वर्गात विभाजित करणे योग्य नाही. महिलांना स्वातंत्र्य नाही तर बरोबरीचा दर्जा हवा आहे. सर्वत्र एक ठरलेली चौकट आहे. याच चौकटीच्या मर्यादेत लेखन व कार्य करण्याची स्वतंत्रता आहे. मात्र ही चौकट तोडून बाहेर पडले की विरोध सुरू होतो. याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागेल, मनातील भावना पुस्तकात मांडाव्या लागतील, असे विचार डॉ. चौहान यांनी यावेळी व्यक्त केले.
अहसास वूमन ऑफ नागपूरच्या सदस्या नीता सिंह यांच्या विविध प्रश्नांना डॉ. चौहान यांनी उत्तर दिले. संचालन परवीन तुली यांनी केले. हॉटेल रेडिसन ब्ल्यूचे सहायक महाप्रबंधक विकास पाल यांनी लेखिकेचा सत्कार केला. यानंतर त्यांनी ‘आफिशियली पतनशील’ हे त्यांचे पुस्तक वाचकांना समर्पित केले. आयोजनात अहसास वूमन ऑफ नागपूरच्या प्रियंका कोठारी, ज्योती कपूर, मोनिका भगवागर आदींचा सहभाग होता.
कोणतेही चांगले पुस्तक हे सामूहिक कर्म असते. एखादा धागा या रचनात्मक निर्मितीचे कारण ठरतो. ‘कलम’चे चर्चासत्र रोखठोक आणि माहितीने परिपूर्ण ठरले.
प्रियंका कोठारी
आजच्या चर्चासत्रात महिलांचे प्रश्न आणि विशेषत: लैंगिकतेच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये मनातील अनेक कुतूहलांचे उत्तर मिळाले. डॉ. चौहान यांनी परिपूर्ण मार्गदर्शन केले.
परवीन तुली
चर्चासत्रात डॉ. चौहान यांनी रोखठोकपणे आपले विचार मांडले. महिलांच्या स्थितीबाबत खूप कमी लोक खुल्या मनाने लेखन करू शकतात. हे चर्चासत्र ऊर्जा प्रदान करणारे ठरले.
नीता सिंह
डॉ. चौहान यांनी अतिशय संवेदनशील विषयावर विचार मांडले. प्रत्येक महिन्याला ‘कलम’चा हा कार्यक्रम होतो. समाजातील अशा विविध विषयांवर चर्चा करणे हा प्रशंसनीय उपक्रम आहे.
विकास पाल