नागपूरच्या मेडिकलमधील एसीबीच्या सापळ्यात महिला डॉक्टरसह दोघे अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:23 AM2018-01-30T00:23:45+5:302018-01-30T00:24:38+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील एका रुग्णाकडून तीन हजार रुपयाची लाच घेताना सोमवारी एका कनिष्ठ डॉक्टरसह महिला डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. रात्री ही कारवाई झाल्याने महिला डॉक्टरला मंगळवारी ताब्यात घेतले जाणार आहे. या कारवाईने मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील एका रुग्णाकडून तीन हजार रुपयाची लाच घेताना सोमवारी एका कनिष्ठ डॉक्टरसह महिला डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. रात्री ही कारवाई झाल्याने महिला डॉक्टरला मंगळवारी ताब्यात घेतले जाणार आहे. या कारवाईने मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी ४७ वर्षीय तक्रारकर्ता आपल्या पत्नीला घेऊन मेडिकलच्या नेत्ररोग विभागात आला. मधुमेहामुळे त्याच्या पत्नीच्या रेटीनाला सूज आली होती. डॉक्टरांनी तपासून त्यांना पुन्हा येण्यास सांगितले. पुन्हा उपचारासाठी आल्यावर डॉक्टरांनी रेटीनाची सूज कमी करण्यासाठी ‘अवॅस्टींज’ नावाचे इंजेक्शन लिहून दिले. या इंजेक्शनची एका व्हायलची किंमत बाजारात २४ हजाराच्या घरात आहे. याशिवाय या व्हायलचे आठ भाग करता येतात; शिवाय मेडिकलच्या ‘रेट कॉन्ट्रॅक्ट’मध्ये हे इंजेक्शन नसल्याने रुग्णालयात ते उपलब्ध राहत नाही. अनेक गरीब रुग्णांना २४ हजाराचे इंजेक्शन घेणे परडवत नसल्याने तेच डॉक्टरांना यातून मार्ग काढण्यास सांगतात. यावर उपाय म्हणून नेत्ररोग विभागाचे डॉक्टर हे इंजेक्शन विकत आणून त्याचे आठ भाग करून गरजू रुग्णांकडून तीन हजार रुपये घेऊन देतात. परंतु यासाठी त्या रुग्णाची संमती घेतात. याच प्रकारातून नेत्ररोग विभागातील कनिष्ठ डॉक्टर स्वानंद प्रधान (२६) व सहायक प्राध्यापक डॉ. वंदना अय्यर (३५) यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारकर्त्यांनी पैशाची व्यवस्था करण्यासाठी काही दिवस मागितले आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यानुसार २८ जानेवारी रोजी तक्रारकर्त्याने पत्नीला नेत्ररोग विभागाच्या वॉर्डात भरती केले. डॉक्टरांकडून इंजेक्शनसाठी तीन हजार रुपयांची मागणी करून पैसे ठेवून घेत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले; नंतर महिला डॉक्टरला सोडून मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर राहण्यास सांगितले.