नागपुरातील शनिमंदिराचे कुलूप तोडून दानपेटीवर कब्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 12:21 AM2020-08-08T00:21:41+5:302020-08-08T00:23:19+5:30
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या मार्गावर असलेल्या शनिमंदिरामधील दानपेटीवर हक्क सांगण्यावरून नातेवाईकांचे दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाने मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यामुळे काही काळ वातावरण गरम झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या मार्गावर असलेल्या शनिमंदिरामधील दानपेटीवर हक्क सांगण्यावरून नातेवाईकांचे दोन गट समोरासमोर आले. यातील एका गटाने मंदिराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यामुळे काही काळ वातावरण गरम झाले होते.
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोहा पुलाजवळ हे पुरातन मंदिर आहे. या शनिमंदिरात भाविकांची नेहमीच वर्दळ असते. तेथे मोठ्या प्रमाणावर दान देणगी येते. दानपेटीवर आपला हक्क आहे, असे सांगून शर्मा परिवारातील मंडळींमध्ये दोन परस्परविरोधी गट पडले आहेत. यातील एका गटातील महिला, पुरुषांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता मंदिराच्या गेटचे कुलूप हातोडीने तोडून मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या गटाला ही माहिती कळताच त्यांनीही तेथे धाव घेतली. दोन्ही गट समोरासमोर झाल्याने वातावरण गरम झाले. ही माहिती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून धंतोली पोलिसांना कळली. त्यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन दोन्ही गटांतील मंडळींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दोन्ही गट एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करीत होते. दोन्ही गटांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदविण्याची भूमिका घेतली. या प्रकरणात वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.