आॅनलाईन लोकमतनागपूर : बालक दिनानिमित्त महापालिकेतर्फे महाल येथील चिटणीस पार्क येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात गॅसच्या फुग्याचा स्फोट झाल्याने महापालिकेच्या शाळांतील अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहिस्तोवर घटनेत नेमके किती विद्यार्थी जखमी झाले त्या विद्यार्थ्यांची नावे व त्यांची संख्या महापालिक प्रशासनाकडून प्राप्त झाली नव्हती.या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन, पदाधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी कोणत्याही स्वरूपाची माहिती देत नव्हते. घटनेनंतर लोकमत प्रतिनिधीने शाळांचे शिक्षक, महापालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच कार्यक्रमाचे आयोजक यांच्याशी संपर्क केला. परंतु अशी कुठलीही घटना आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.घटना घडली तेव्हा उपस्थित नसल्याचे दिलीप दिवे यांनी सांगितले. वास्तविक त्यांना या घटनेची माहितीच नव्हती. कार्यक्रमाच्या वेळी काही तरी घडल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षणाधिकारयांनी त्यांना दिली होती. नेमके काय घडले, याची माहिती त्यांच्याकडे नव्हती.त्यामुळे महापालिके च्या शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.विद्यार्थी एकमेकांवर पडलेमहापालिकेतर्फे चिटणीस पार्क येथे सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रम संपत असताना काही विद्यार्थी मंचावर लावण्यात आलेले गॅसचे फुगे घेण्यासाठी धावले. यात फुगा फुटला. यामुळे मंचावर चढताना एकच गोंधळ उडाला. यात विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर पडले. फुगा फुटल्याने काही विद्यार्थ्यांच्या डोळ्याला व हाताला इजा झाली.