लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला आणि स्वत:सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष, उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. म्हणूनच भगवान गौतमाची सर्वश्रेष्ठ बुद्ध आणि १० हजार वर्षाच्या मानवी इतिहासातील सर्वश्रेष्ठ महामानव म्हणून गणना केली जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली लाखो अनुयांयासह बौद्धधम्माची दीक्षा ग्रहण केली. ज्या महापुरुषाचे आपण अनुयायी आहोत त्या बुद्धांचा, त्यांच्या चारित्र्याचा, ज्ञानाचा व तत्त्वज्ञानाचा परिचय व्हावा, यासाठी त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा श्रेष्ठ ग्रंथ बहाल केला. बाबासाहेबांच्या या बुद्ध चरित्राचा नाट्यमय आविष्कार म्हणजे ‘तथागत’ हे महानाट्य होय. खुद्द बाबासाहेबच हे बुद्धचरित्र सांगत आहेत, ही पार्श्वभूमी असलेल्या या महानाट्यातून नागपूरकरांनी शुक्रवारी बुद्ध व त्यांचा धम्म जाणला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारीत खासदार महोत्सवात शुक्रवारी मंथनची निर्मिती, मोहन मदान यांची प्रस्तुती आणि शैलेंद्र कृष्णा बागडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या महानाट्याचा प्रयोग रंगमंचावर झाला. तथागताचा जन्म म्हणजे विश्वाच्या मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील अलौकिक घडामोडच होय. एका राजघराण्यात जन्माला आलेला, जगातल्या श्रेष्ठ अशा सुखसुविधा, भोगविलास मिळूनही अस्वस्थ असणारा राजपूत्र, या अस्वस्थतेतून सुखाच्या शोधात राजपाठाचा त्याग करून वनाश्रमात गेलेला गौतमीपूत्र, कठोर, परिश्रमपूर्ण तपश्चर्या करूनही हाती काही न लागल्याने निराश झालेला मुनी आणि शेवटी अथांग, अनंत अशा विचारातून सत्याचा, दु:खांचा, त्यांच्या कारणांचा शोध लागलेला संमासंबोधी बुद्ध. बुद्धत्व प्राप्तीनंतर समाजात पसरलेली अराजकता, असमानता, अमानवीयता, भेदभाव, हिंसा संपविण्यासाठी झटणारा शाक्यमुनी आणि मानवतेची, अहिंसेची, ज्ञानाची, विज्ञानवादाची शिकवण देणाऱ्या बौद्ध धम्माचा संस्थापक बुद्ध, असा हा प्रवास उलगडणारे हे महानाट्य.राजा शुद्धोधन नेतृत्व करीत असलेल्या शाक्यांचे गणतंत्र, सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापूर्वीची पार्श्वभूमी, राजमाता महामाया यांच्या प्रसववेदनेतून लुंबिनी वनात जन्माला आलेले सिद्धार्थ, असितमुनीच्या भविष्यवाणीने अस्वस्थ झालेले व आपला पुत्र वानप्रस्थास न जाता गृहस्थाश्रमात राहून चक्रवर्ती सम्राट व्हावा म्हणून सर्व भोगविलासात गुंतविण्यासाठी शुद्धोधनाचे प्रयत्न हे सर्व ओघानेच येते. अक्षरविद्या व शस्त्रविद्येत सर्वश्रेष्ठ असूनही रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य व कोलिय वंशात रंगलेल्या राजकीय सारीपाटाच्या कारणाने सर्वस्वाचा त्याग करून सिद्धार्थ वानप्रस्थास जातो व सत्याच्या शोधासाठी तपश्चर्या करतो.पुढे बुद्धत्व प्राप्तीनंतर पहिला धम्मसंदेश देईपर्यंत विविध घटनांचा धावता उल्लेख महानाट्यात येतो. प्रभावी आणि वेगवान मांडणी, कलावंतांचा अभिनय आणि घटनाक्रमानुसार गीतसंगीताची बहारदार सोबत यामुळे हे महानाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले. महानाट्याचे लेखन किरण बागडे, संगीत भूपेश सवाई, प्रकाश व्यवस्था मंगेश विजयकर, नेपथ्य सुरेश मेश्राम व नृत्य अमोल मोतेवार, अदल बोजावार व चिन्मयी यांनी साकार केले. चरित्र मांडणारे बाबासाहेबांची भूमिका देवा बोरकर यांनी केली तर पार्श्वस्वर दिवंगत अभिनेता ओम पुरी व ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांचे होते. कलावंतांमध्ये तथागत बुद्ध राकेश खाडे यांनी साकारला तर यशराज यांनी राजपुत्र सिद्धार्थ व राजा शुद्धोधन सुधीर पाटील यांनी उभा केला. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री व राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे, भाजपचे संघटन महामंत्री विजय पुराणिक, आमदार अनिल सोले, आमदार डॉ. मिलिंद माने, भूपेश थुलकर, नाना शामकुळे, सुभाष पारधी, धरमपाल मेश्राम, अंबादास उके, अरविंद गजभिये, प्राचार्य केशव भगत, संदीप जाधव, संदीप गवई, जयप्रकाश गुप्ता, अशोक मेंढे आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले.कलावंत व शेतकऱ्यांचा सत्कारयावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक वामनराव गाणार, चित्रकार प्रमोदबाबू रामटेके व न्यूरासर्जन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सावनेर तालुक्यातील आजनी गावचे राजेश भगल, गुमथाळा गावचे संदीप व सचिन उमाटे, वर्धा जिल्ह्यातील महांकाळ गावचे राजू विश्वनाथ पाहुणे, गोंदियाचे दीनदयाल नागपुरे या शेतकऱ्यांचा व आनंदराव राऊत यांनाही गौरविण्यात आले.