लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सम्राट अशोकानंतर जेव्हा बौद्ध धम्माचा प्रसार जगभरात वेगाने होत असल्याचे पाहून बुद्ध धम्माचे विरोधक विचलित झाले होते. धम्माला रोखण्यासाठी विरोधकानी हिंसक मार्गासह बौद्धिक गैरसमज पसरविण्याचा सपाटा सुरू केला. याअंतर्गत जगात दु:ख असल्याचे सांगणाऱ्या बुद्धाचा धम्म निराशावादी आहे असा गैरसमज पसरविण्यात आला. मात्र दु:ख सांगताना बुद्धाने त्याचे शास्त्रीय कारण आणि ते दूर करण्याचे वैज्ञानिक उपायही सांगितले. त्यामुळे बुद्धाचा धम्म हा निराशावादी नाही तर सर्वाधिक आशावादी आहे, असे मत भदंत विमलकित्ती गुणसिरी यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथे शुक्रवारी हैदराबादचे प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत व लेखक डॉ. एन.एन. बुसी यांच्या बौद्ध धम्मावरील चार ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये ‘गौतम बुद्ध : लाईफ अॅन्ड टीचिंग, रिनाईसन्स आॅफ बुद्धिजम इन इंडिया : कॉन्ट्रीब्यूशन आॅफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दि फुटप्रिन्ट आॅफ बुद्धिजम इन इंडिया : अ पिक्टोरियल प्रेझेन्टेशन’ आणि ‘गौतम बुद्धा : ए पिक्टोरियल बॉयोग्राफी’ या चार इंग्रजी ग्रंथांचा समावेश आहे. प्रकाशन कार्यक्रमात औरंगाबादचे भौतिकशास्त्र विभागप्रमुख भदंत आनंद, डॉ. मधफकर कासारे, डॉ. बुसी यांच्या पत्नी सरोजा बुसी, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, के.के. राजा, लेखक डॉ. सुरेंद्र मांडवधरे, डॉ. कृष्णा कांबळे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे एन.आर. सुटे, विलास गजघाटे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. बुसी यांच्या पुस्तकावर भाष्य करताना, भदंत गुणसिरी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत काही प्रश्न उपस्थित केले होते. हे प्रश्न म्हणजे त्यावेळी सामान्य माणसांची जनभावना होती व त्याचे शास्त्रशुद्ध उत्तरही बाबासाहेबांनीच दिले होते. मात्र ते संक्षिप्त स्वरुपात असल्याने त्याबाबत गैरसमज पसरविले जातात. वास्तविक बुद्धाने आत्मा व पुनर्जन्म नाकारला कारण तो निसर्गाच्या नियमात बसत नाही. न बदलणारी गोष्ट म्हणजे ऊर्जा होय, जी एका रुपातून दुसऱ्या रुपात जाते, हे वैज्ञानिक सत्य बुद्धाने मांडले. बाबासाहेबांनी निष्क्रिय झालेल्या भिक्षू संघावर आक्षेप घेतला होता व त्यांचे कार्य सांगितले होते. बाबासाहेबांनी उलगडलेले बुद्धाचे चार आर्यसत्य व इतर शास्त्रीय विचार डॉ. बुसी यांनी अतिशय सुटसुटीतपणे त्यांच्या ग्रंथात मांडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. एस.एन. बुसी म्हणाले, बुद्धाचे तत्त्वज्ञान मांडताना बाबासाहेबांना लोकांकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न या ग्रंथांच्या माध्यमातून के ला आहे. त्यांच्या इच्छेनुसार बौद्धांचा स्वतंत्र धम्मग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांनी शैक्षणिक संस्था सुरू केल्या, मात्र बुद्ध धम्माची शिकवण मिळेल, अशी शाळा-महाविद्यालये त्यांना वेळेमुळे सुरू करता आली नाही. त्यांना दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई या मोठ्या शहरात बौद्ध विहारांचे जाळे निर्माण करायचे होते व भव्य असे बौद्ध धम्म सत्ता केंदे्र निर्माण करायची होती. अशी अनेक महत्त्वाची कामे ते वेळेमुळे पूर्ण करू शकले नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दीक्षाभूमीला आंतरराष्ट्रीय बौद्ध संशोधन केंद्र स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी स्मारक समितीला यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गौतम कांबळे यांनी केले व संचालन पाली विभागप्रमुख डॉ. मोहन वानखेडे यांनी केले.