लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला अनेक वर्षे घेतली. यामागे त्यांचे एक नियोजन होते. आपल्या अनुयायांना यासाठी त्यांना तयार करावयाचे होते. माझ्या बाबतीतही कार्यकर्ते असाच विचार करीत असतील की मायावती या बौद्ध धम्माची दीक्षा कधी घेणार? मी नक्कीच बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. परंतु त्यासाठी योग्य वेळ यायची आहे. योग्य वेळ आली, माझ्यासोबत मोठ्या संख्येने लोक धम्म स्वीकारण्यास तयार झाले की मीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेईल, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे जाहीर केले. बसपाच्या विदर्भातील सर्व ६२ उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी इंदोरा येथील मैदानात बसपा अध्यक्ष मायावती यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी पक्षाचे प्रदेश प्रभारी खा. वीरसिंग, डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे आदी उपस्थित होते.मायावती म्हणाल्या, काँग्रेस आणि भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. काँग्रेस आणि भाजपचे आतून संगनमत आहे. या संगनमतामुळेच शासकीय नोकरीतील आरक्षणाला निष्प्रभ करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. कांशीराम यांनी महाराष्ट्रातून राजकीय चळवळीची सुरुवात केली, परंतु त्यांना येथे कधीच यश आले नाही, याची खंत त्यांनी नेहमीच होती. ती खंत मलाही आहे. येथील आंबेडकरी अनुयायी घोषणा खूप देतात, परंतु मत देताना ते गोंधळून जातात. आंबेडकरी अनुयायी अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या राजकीय विचारांवर चालत नाहीत, अशी खंतही मायावती यांनी व्यक्त केली.भारत हे हिंदू नव्हे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्रभारत हे हिंदू राष्ट्र नव्हे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे स्पष्ट करीत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याचा जाहीर निषेध बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी केला. भागवत यांनी हा देश हिंदूंचा असल्यामुळेच येथे मुस्लीम आनंदात असल्याचे वक्तव्य केले होते. याची आठवण करून देत भागवत यांनी सच्चर कमिटीचा अहवालाचा अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
योग्य वेळी घेणार बौद्ध धम्माची दीक्षा : मायावती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 8:44 PM
मी नक्कीच बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. परंतु त्यासाठी योग्य वेळ यायची आहे. योग्य वेळ आली, माझ्यासोबत मोठ्या संख्येने लोक धम्म स्वीकारण्यास तयार झाले की मीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेईल, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे जाहीर केले.
ठळक मुद्देभाजप-काँग्रेसच्या धोरणावर केली टीका