नागपुरात बिल्डरचा गुंडांसोबत हैदोस, तरुणीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:28 PM2019-09-05T23:28:13+5:302019-09-05T23:29:04+5:30

जागा हडपण्यासाठी बिल्डरच्या एका जोडगोळीने आपल्या गुंड साथीदारांच्या मदतीने एका गरीब कुटुंबाच्या घराची तोडफोड केली. विरोध करणाऱ्या तरुणीला अनेकांसमोर मारहाण केली.

Builder Chaos with goons , beaten up young lady in Nagpur | नागपुरात बिल्डरचा गुंडांसोबत हैदोस, तरुणीला मारहाण

नागपुरात बिल्डरचा गुंडांसोबत हैदोस, तरुणीला मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देकंपाऊंडवर चालवली जेसीबी : जमीन हडपण्यासाठी दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागा हडपण्यासाठी बिल्डरच्या एका जोडगोळीने आपल्या गुंड साथीदारांच्या मदतीने एका गरीब कुटुंबाच्या घराची तोडफोड केली. तर, बाजूच्या जागेवरील कंपाऊंडवर जेसीबी चालवून तेथील साहित्य जमीनदोस्त केले. विरोध करणाऱ्या तरुणीला अनेकांसमोर मारहाण करून तिच्या घरातील दैनंदिन वापराच्या चिजवस्तू तसेच रोख आणि दागिनेही जबरदस्तीने हिसकावून घेतले. तेथे आपल्या नावाचा फलक (बोर्ड) लावून आरोपी पळून गेले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शताब्दीनगरात बुधवारी भरदिवसा बिल्डर आणि त्याच्या साथीदारांनी घातलेल्या हैदोसामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली होती. विजय बागडे आणि श्रीकृष्ण यादव अशी आरोपी बिल्डरांची नावे आहेत.
आरोपी बागडे, यादव या दोघांची शताब्दीनगरातील काही भूखंडावर नजर होती. त्यावर कब्जा करण्यासाठी आरोपी बिल्डर बागडे आणि यादव या दोघांनी त्यांचे साथीदार किशोरसिंग बैस, राजू साळवे, मनीष तसेच अन्य ७ ते ८ गुंडांना सोबत घेऊन बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास शताब्दीनगरातील २० क्रमांकाच्या भूखंडावर राहणारी लक्ष्मी बबनराव नारनवरे हिच्या घरावर धडक दिली. नारनवरेच्या घरावरचे कवेलू फोडून नासधूस केल्यामुळे लक्ष्मी नारनवरे विरोध करू लागली. त्यामुळे आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. तिचा विरोध मोडून काढल्यानंतर आरोपींनी तिच्या घरातील आलमारी, झोपण्याची खाट, कपडे, चांदीचे दागिने आणि रक्कम उचलून आपल्या ट्रकमध्ये भरली. बाजूलाच संगीता उपाध्याय यांचा भूखंड आहे. त्याचे कंपाऊंड आरोपी बिल्डरांनी आपल्या गुंड साथीदारांच्या मदतीने जेसीबीने तोडून टाकले आणि जमीन समांतर करून तेथे शिवम बिल्डर नावाचा बोर्ड लावला. तब्बल तासभर हा हैदोस सुरू होता आणि लक्ष्मी नारनवरे ही तरुणी दिनवाणा आक्रोश करीत होती. यावेळी परिसरातील बघ्यांनी मोठी गर्दी केली. तणाव निर्माण झाल्याचे पाहून आरोपी पळून गेले. दरम्यान, रक्षदा बबनराव नारनवरे (वय २१) हिने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी बिल्डर बागडे, यादव आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध दरोडा घालण्याचा गुन्हा दाखल केला.

जे होईल ते करून घ्या !
आरोपी जेव्हा नारनवरे आणि उपाध्यायच्या भूखंडावर तोडफोड करीत होते तेव्हा पीडितांचा आक्रोश सुरू होता. यावेळी त्यांना कुणी पोलिसांना कळवा, असे म्हटले असता आरोपी त्यांना ‘ ज्यांना बोलवायचे त्यांना बोलवा, जे होईल ते करून घ्या, असे म्हणत होते. आम्ही सर्व सेटिंग केली, असेही आरोपी म्हणत होते. या प्रकरणात अजनी पोलिसांनी प्रारंभी संशयास्पद भूमिका वठविली. त्यातून आरोपी बिल्डर बागडे आणि यादवचा निर्ढावलेपणा कशामुळे होता, ते नागरिकांच्या लक्षात आले. परिणामी लोकभावना संतप्त झाल्या. प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाल्याने अजनी पोलिसांनी धावपळ करून रात्री दोन्ही बिल्डर आणि मनीष रॉबर्ट नामक आरोपीला अटक केली. उर्वरित आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title: Builder Chaos with goons , beaten up young lady in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.