बिल्डरने केली दगाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:08 AM2021-03-01T04:08:35+5:302021-03-01T04:08:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या विक्रीचा करारनामा करून एका ठगबाजाने अनेकांकडून लाखो रुपये घेतले. या गाळ्यांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या विक्रीचा करारनामा करून एका ठगबाजाने अनेकांकडून लाखो रुपये घेतले. या गाळ्यांचे विक्रीपत्र त्यांना करून न देता आपल्या पत्नीच्या नावे केले आणि त्याआधारे बँकेतून लाखोंचे कर्ज उचलले. तब्बल १५ वर्षांनंतर बिल्डरच्या या बनवाबनवीचा भंडाफोड झाला अन् अजनी पोलिसांनी या प्रकरणात आरोपी ठगबाज बिल्डर रविशंकर चंद्रभान गुप्ता (वय ४७, रा. पार्वतीनगर रामेश्वरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फसगत झालेल्या गाळेधारकांच्या वतीने बिहारीलाल शिवप्रसाद सोनी (वय ४५, रा. अभिजितनगर, मानेवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गुप्ता बिल्डरने २००६ मध्ये रामेश्वरी चौकाजवळ गुप्ता कॉम्प्लेक्स नावाची इमारत बांधली. तेथे सोनी आणि इतरांनी व्यापारी गाळे खरेदी करून गुप्ताला त्यावेळी २० लाख ८५ हजार ९४० रुपये दिले. २५ जून २००६ ला त्यांच्यात विक्रीपत्राचा करारनामा झाला. मात्र, बिल्डर गुप्ताने गाळे खरेदी करून रक्कम मोजणाऱ्यांना विक्रीपत्र करून दिले नाही. त्याने या मालमत्तेचे विक्रीपत्र स्वत:च्या पत्नीच्या नावे केले आणि त्याआधारे बँकेतून कर्ज उचलले. गुप्ता विक्रीपत्र करून देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने गाळेधारकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, त्या दुर्लक्षित झाल्या. तर, हे गाळे बँकेत गहाण असल्याची माहिती आता बाहेर आल्याने गाळेधारकात खळबळ निर्माण झाली. त्यांनी २५ फेब्रुवारीला अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
----
दोन महिन्यापूर्वीच कारागृहातून आला
आरोपी गुप्ता याचे कपड्याचे दुकान आहे. त्याच्यावर गेल्यावर्षी असाच दुसरा एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दोन महिन्यापूर्वीच तो त्या गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आला. शनिवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याची माहिती अजनीचे ठाणेदार विनोद चाैधरी यांनी दिली.
---