चोरीच्या दुचाकीवरून केली घरफोडी, दोन चोरट्यांना अटक
By योगेश पांडे | Published: January 25, 2024 04:04 PM2024-01-25T16:04:11+5:302024-01-25T16:04:49+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : पत्नीचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या व्यक्तीकडे घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांनी चोरीच्या दुचाकीवरून येऊन संबंधित घरफोडी केली होती. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. दिवाकर पुंडलिक बदन (३४, विश्वजित सोसायटी, महाविष्णू नगर, नरसाळा) यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्यामुळे ते ३ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घराला कुलूप लावून पत्नी व मुलासह मित्राच्या घरी गेले. त्यानंतर रात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व लॅपटॉप असा २.१७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता हा प्रकार उघडकीस आला. दिवाकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे शेख शहाबाज उर्फ बल्लू शेख फारूख (२२, मोठा ताजबाग, सक्करदरा) व मोहम्मद अरशद साजीद शेख (१८, यासीन प्लॉट, ताजबाग) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनीही घरफोडी केल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमएच ४९ एन ३०१८ ही दुचाकीदेखील चोरल्याचे सांगितले. त्याच दुचाकीवरून जाऊन त्यांनी घरफोडी केली होती. त्यांच्या ताब्यातून ३.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यांना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले.