बसेस वेळेवर येत नाही; स्वच्छतेचाही अभाव : महापौरांचा प्रवाशांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:51 AM2019-12-10T00:51:43+5:302019-12-10T00:53:17+5:30
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस वेळेवर येत नाही. डेपोतून बसेस स्वच्छ न करताच सोडल्या जातात. बसमध्ये धूळ व कचरा असतो. मोरभवन डेपोतही अस्वच्छता व सुविधांचा अभाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस वेळेवर येत नाही. डेपोतून बसेस स्वच्छ न करताच सोडल्या जातात. बसमध्ये धूळ व कचरा असतो. मोरभवन डेपोतही अस्वच्छता व सुविधांचा अभाव आहे. चालक व वाहक सौजन्याने वागत नाही. अनेकदा पैसे ,दिल्यानंतरही प्रवाशांना तिकिटी मिळत नाही. अशा तक्रारी शहर बसमधील प्रवाशांनी मांडल्या.
शहरातील नागरिकांना उत्तम परिवहन सेवा मिळावी, यासाठी महापालिकेतर्फे आपली बस सेवा चालविली जाते. मात्र बसमधुन प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा तक्रारी नागरिकांकडून मांडल्या जातात. प्रवाशांच्या तक्रारी आणि आपली बस मधील व्यवस्था याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी महापौरसंदीप जोशी यांनी शहर बसमधून प्रवास करून थेट प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे उपस्थित होते.
जोशी व कुकडे यांनी आकाशवाणी चौक ते संविधान चौक दरम्यान बसमधून प्रवास करून प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे बस ऑपरेटचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
. अनेकदा वाहकांकडून तिकीट दिले जात नाही, स्थानकावर बस थांबत नाही. बस वेळेवर येत नसल्याने प्रतिक्षा करावी लागते. यामुळे कार्यालयात जाण्याला उशिर होतो. अशा अनेक समस्या प्रवाशांनी मांडल्या. बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत महापौरांनी समस्या जाणून घेतल्या. बर्डी-शांतीनगर-कामठी मार्गावरील बसमधील ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना पूर्ण तिकीट दिल्याची तक्रार बसमधील प्रवाशांनी केली. याबाबत संबंधित बस वाहकावर कारवाईचे निर्देश जोशी यांनी दिले.
प्रवाशांशी सौजन्याने वागा
शहर बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचे चालक, वाहक योग्य वागणूक देत नसल्याची अनेक नागरिकांची तक्रारी आहेत. याची दखल घेत महापौरांनी कर्मचाऱ्यांना प्रवाशासोबत सौजन्याने वागण्याचा चालक व वाहकांना दिला. यावेळी विद्यार्थी तसेच नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. मोरभवन बस स्थानक परिसरातील रस्त्याची स्थिती वाईट आहे. यावर महापौरांनी याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले.