आॅनलाईन लोकमतनागपूर : व्यावसायिक स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादात पाच आरोपींनी मानेवाडा चौकातून एका तरुणाचे अपहरण केले. त्याला भांडेवाडी येथील गोदामात नेऊन लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.राजेश तिवारी (३०, रा. मानेवाडा) असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. तो पीओपीचे काम करतो. तेच काम निजाम खान नामक आरोपीही करतो. प्रारंभी राजेश व निजाम खान हे दोघेही पीओपीचा व्यवसाय सोबत करायचे. त्यांच्यात एकमेकांचे लेबर पळवून नेण्यावरून वितुष्ट आले. नंतर वाद वाढतच गेला. शिवीगाळ धमक्या वाढल्या. अनेकदा दोघे हमरीतुमरीवरही आले. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सकाळी राजेश कामावर जाण्याकरिता घरून निघाला. आरोपी निजाम तसेच मुन्ना, छोटकन व इतर दोन आरोपी त्याच्या मागावरच होते. त्यांनी मानेवाडा चौकात राजेशला आपल्या इनोव्हा कारमध्ये ओढले. यापूर्वी नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात समेट करू, असा बहाणा करून त्याला भांडेवाडी येथील आपल्या गोदामात नेले. तेथे त्याला आरोपींनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. राजेशने प्रसंगावधान राखत हातपाय जोडून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपींनी त्याच्याकडील दागिने व रोख रकम जबरीने हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद केले.सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी निजाम हा पूर्वी एका राष्ट्रीय पक्षाचा शाखा उपाध्यक्ष होता. सध्या तो जनसुराज्य पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगतो. त्याच्या इनोव्हा कारवर तसा उल्लेख असल्याची माहिती आहे.यापूर्वी झाला वादत्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी मोबाईल फोनवरून एकामेकाला पाहून घेण्याची धमकी दिली होती. निजाम खान याने नंदनवन पोलिसात त्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तिची अदाखलपात्र नोंद केली होती. त्यामुळे वाद धुमसतच गेला अन् आज अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली. यासंबंधाने वारंवार संपर्क करूनही उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांकडून माहिती मिळाली नाही.
नागपुरात व्यावसायिक स्पर्धेतून केले तरुणाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 2:08 PM
व्यावसायिक स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादात पाच आरोपींनी मानेवाडा चौकातून एका तरुणाचे अपहरण केले. त्याला भांडेवाडी येथील गोदामात नेऊन लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
ठळक मुद्देभांडेवाडीत नेऊन मारहाण : हुडकेश्वरमधील घटना