गटबाजी करणाऱ्या नेत्यांना पटोले लावणार का टोले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 12:31 AM2021-07-24T00:31:07+5:302021-07-24T00:31:34+5:30

Nana Patole गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत परत आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सक्रिय झाले आहेत. शनिवारी तीन विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मात्र, पटोलेंच्या मिशन महापालिकेत काँग्रेसमधील गटबाजीचा मुख्य अडथळा आहे. पटोले आता गटबाजी करणाऱ्या नेत्यांना टोले लावतात की तेही फेल ठरतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे.

Can Nana Patole slapp groupism leaders | गटबाजी करणाऱ्या नेत्यांना पटोले लावणार का टोले?

गटबाजी करणाऱ्या नेत्यांना पटोले लावणार का टोले?

Next
ठळक मुद्देनेत्यांमधील कुस्तीमुळे मनपा निवडणुकीत काँग्रेस चीत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत परत आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सक्रिय झाले आहेत. शनिवारी तीन विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मात्र, पटोलेंच्या मिशन महापालिकेत काँग्रेसमधील गटबाजीचा मुख्य अडथळा आहे. पटोले आता गटबाजी करणाऱ्या नेत्यांना टोले लावतात की तेही फेल ठरतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे.

महापालिकेच्या गेल्या तीन निवडणुकांचा इतिहास पाहता गटबाजीमुळे काँग्रेसने भाजपला महापालिकेची सत्ता ‘गिफ्ट’ दिली. एकजुटीमुळे भाजपचे संख्याबळ सातत्याने वाढत शंभरपार गेले तर काँग्रेस तीसच्या खाली घसरली. २०१७ च्या निवडणुकीत तर टोकाची गटबाजी पहायला मिळाली. ए-बी फॉर्म वितरणात शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी घोळ केल्याचे आरोप झाले. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर पूर्व नागपुरातील जाहीर सभेत शाई फेकण्यात आली. काँग्रेस नेत्यांनी एकमेकांचे उमेदवार आपटण्याचे काम केले. पुन्हा एकदा सत्ता गेली. निवडणुकीनंतरही गटबाजी कायम राहिली. माजी खासदार विलास मुत्तेमवार गटाचे संजय महाकाळकर यांना विरोधी पक्षनेतेपदावरून खाली खेचण्यासाठी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी गटाने ताकद लावली. त्यांना नितीन राऊत- अनीस अहमद समर्थकांनी साथ दिली. त्यात ते यशस्वीही झाले. नगरसेवकांचे संख्याबळ जमवून शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचा मनोनित नेगरसेवक होण्याचा मार्गही रोखला. गेली साडेचार वर्षे महापालिकेत काँग्रेसमध्येच कलगितुरा रंगताना दिसला. यामुळे काँग्रेस अधिक दुबळी झाली.

पुन्हा एकदा ठाकरे हटाव मोहीम

राऊत-चतुर्वेदी गटाने पुन्हा एकदा आ. विकास ठाकरे यांना शहर अध्यक्ष पदावरून हटविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. ठाकरे यांना अध्यक्षपदी सात वर्षे झाले आहेत. ते आता पक्षाचे आमदार असून नासुप्रचे विश्वस्तही आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडून अध्यक्षपद काढून घ्यावे, अशी मागणी या गटाने पुन्हा एकदा दिल्ली दरबारी केली आहे. तर ‘ठाकरेही खेलेंगी अगली पारी’, असे ठाकरे समर्थक ठासून सांगत असून त्यांच्याच नेतृत्वात महापालिका निवडणूक होईल, असा दावा करीत आहेत. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये अंतर्गत कुस्ती पहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

आज तीन विधानसभा मतदारसंघांचा आढावा

- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनपा निवडणुकीसाठी शनिवारी पश्चिम नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर अशा तीन विधानसभा मतदारसंघाची बैठक आयोजित केली आहे. पालकमंत्री नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला पक्षाचे आमदार, विधानसभेचे उमेदवार, नगरसेवक, मनपाचे उमेदवार, माजी नगरसेवक, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दक्षिण- पश्चिमची बैठक दुपारी १२ वाजता अनसूया मंगल कार्यालयात, पश्चिमची दुपारी २ वाजता गोरेवाडा रिंगरोडवरील राठोड लॉनवर तर दक्षिणची बैठक दुपारी ४ वाजता महाकाळकर सभागृहात होणार आहे.

Web Title: Can Nana Patole slapp groupism leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.