उमरेड : कोरोना काळात आलेली मरगळ, अस्वस्थता, भीती थोडी फार कमी होत असतानाच अचानकपणे वाढत्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे पुन्हा सारेच दचकले. अशातच उमरेड येथे शिवजयंती महोत्सवासह काही मोठ्या कार्यक्रमाचेही नियोजन होते. मराठा सेवा संघासह अन्य आयोजकांनी नियोजित मोठे कार्यक्रम रद्द करीत छोट्या स्वरूपात योग्य काळजी घेत शिवजयंती साजरी केली. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला असला तरी अधिक गर्दी टाळण्यासाठी आणि आपल्या गावात कोरोना अधिक पसरू नये, यासाठी उचललेले हे पाऊल अनेकांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरले.
इतवारी मुख्य बाजारपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत मराठा सेवा संघाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघाचे हरिदास पांगुळ, विश्वास गोतमारे, संजय कोंडेकर, भास्कर फरकाडे, गजानन राऊत, मनीष शिंगणे, रितेश राऊत, गजानन ढोबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थानिक शाखेचे नगर संचालक अनिल गोविंदानी आदींची उपस्थिती होती. कावरापेठ येथील दरबार सय्यद शाह बाबा येथे शिवाजी महाराज जयंतीसोबतच सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करीत एकात्मतेचे दर्शन दिले. संभाजी ब्रिगेड, पुष्पक महाविद्यालय, टीसीटीएम ग्रुप यांच्या वतीनेही शिवजयंती साजरी करण्यात आली.