‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’बाबतचा निर्णय तातडीने रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 09:56 PM2018-04-05T21:56:07+5:302018-04-05T21:56:19+5:30
अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय हा अनुसूचित जाती व जमातीसाठी अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाच्यावतीने करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरुद्ध गुरुवारी समता सैनिक दलाने समता जागर मार्च काढून या निर्णयाचा जाहीर निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय हा अनुसूचित जाती व जमातीसाठी अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाच्यावतीने करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरुद्ध गुरुवारी समता सैनिक दलाने समता जागर मार्च काढून या निर्णयाचा जाहीर निषेध केला.
समता सैनिक दलाच्या पुढाकाराने गुरुवारी दुपारी संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून समता जागर मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये ५० च्या वर एस.सी., एसटी. व आंबेडकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स कॉलेजच्या चौकात हा मार्च अडवण्यात आला. येथे मार्चचे सभेत रुपांतर जाले. अनेकांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अन्यायाकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यानंतर एक शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना आणि उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निवेदन सादर करण्यात आले.
या मार्चमध्ये भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, घनश्याम फुसे, ई.झेड. खोब्रागडे, शिवदास वासे, राजरतन कुंभारे, विश्वास पाटील, सुनील जवादे, वंदना जीवने, संजय जीवने, उषाताई बौद्ध, संजय पाटील, रोशन बेहरे, राजेश लांजेवार, प्रफुल्ल मेश्राम, आनंद तेलंग, प्रदीप गणवीर, विनोद बन्सोड, दादाराव तागडे, अजय बोरकर, आनंद पिल्लेवान, अनिल इंगळे, रितेश देशभ्रतार, तुफान कांबळे आदींसह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.