लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यातील बारावीच्या परीक्षादेखील रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर असे झाले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. विद्यापीठाला पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे नियम नव्याने तयार करावे लागतील.
बारावीचे निकाल पहिल्यांदाच परीक्षेशिवाय घोषित होणार आहेत. आतापर्यंत विद्यापीठात जुन्या नियमांच्या आधारे प्रवेश होत होते. मात्र यंदा नियमात बदल करावे लागतील. शिवाय हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याचीदेखील काळजी घ्यावी लागेल.
सद्यस्थितीत यासंदर्भात विद्यापीठाने प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली आहे. विद्यापीठाचे लक्ष बारावीच्या निकालांवर आहे. जर राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर विद्यार्थ्यांना प्रवेश कसा द्यायचा याचे मापदंड ठरविण्यात येतील, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले.