जगदीश जोशी
नागपूर : कुख्यात डेकाटे टाेळीच्या दहशतीचे बळी ठरलेले बिल्डर माेहन दाणी यांच्याकडून आराेपींनी १६ लाखाच्या कर्जाच्या माेबदल्यात नगदी आणि स्थावर संपत्ती मिळून तीन काेटी रुपये वसूल केले. तीन काेटी वसूल केल्यानंतरही गुंडांनी दाणी यांचे जगणे कठीण केले हाेते. त्यांच्या शेतावर कब्जा केल्यानंतर या गुंडांचा दाणी यांच्या घरावरही डाेळा हाेता.
उल्लेखनीय म्हणजे गुन्हे शाखेने राकेश डेकाटे व त्याच्या साथीदारांची पाळेमुळे खाेदण्याचा प्रयत्न चालविला आहे. ६१ वर्षीय माेहन दाणी यांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपी राकेश डेकाटे, महेश ऊर्फ गणेश साबणे व मदन काळे यांना अटक केली आहे. राकेशचा भाऊ मुकेश ठाकरे व नरेश ठाकरे हे फरार आहेत. हे प्रकरण म्हणजे लाेकमतने प्रकाशात आणलेले गुन्हेगारीत असलेले गुंड कसे भूमाफिया हाेतात, याचा पुरावाच हाेय. राकेश डेकाटे हा चाेरी, चेनस्नॅचिंग व अपहरणासारख्या गुन्ह्यात लिप्त असलेला ‘चिल्लर गुंड’ हाेता. त्याच्याविराेधात २६ गुन्हे दाखल आहेत, तरीही ताे पाेलिसांच्या डाेळ्यातून वाचलेला हाेता. स्थानिक नेत्यांच्या मदतीने अवैध सावकारीचे काम त्याने सुरू केले. दाणी यांची मदन काळे व गणेश साबणे यांच्याशी ओळख हाेती. मदनचा भाऊ मिलन हा मित्र असल्याने दाणी यांचा मदनवर भरवसा हाेता. डिसेंबर २०१० मध्ये अभ्यंकर मार्ग, धंताेली येथे दाणी यांचे बांधकाम सुरू हाेते. या कामासाठीच त्यांनी मदन काळे व साबणे यांच्याकडून दाेन लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी वेळाेवेळी मिळून १६ लाखाचे कर्ज घेतले. या कर्जाच्या बदल्यात दाणी यांनी काळे व साबणेला जून २०१३ पर्यंत मूळ राशी व व्याजासह ७३ लाख रुपये दिले.
जून २०१३ मध्ये दाणी यांची मदनच्या धरमपेठस्थित कार्यालयात कुख्यात राकेश डेकाटेशी भेट झाली. डेकाटे शहरातील कुख्यात गुंड असून, त्यांना त्याचे एक काेटी रुपये द्यायचे आहेत, असे सांगितले. मार्च-एप्रिल २०१४ मध्ये डेकाटेने दाणी यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याच्या घाट राेडस्थित कार्यालयात नेले आणि मारहाण केली. अडीच काेटीचे कर्ज असल्याचे सांगून हिंगणा येथील १८ एकर शेती देण्यास सांगितले. यानंतर १८ मे २०१८ मध्ये दाणीच्या मालकीची पावणेदाेन काेटीच्या शेतीचा केवळ ४५ लाखात साैदा केला. रजिस्ट्रीच्या वेळी ५ लाख आणि उर्वरित ४० लाखासाठी सहा धनादेश देणार असल्याचे सांगितले. पाच लाख रुपयेसुद्धा दाणीला देण्यात आले नाही. दाणी यांच्या नावे एका खासगी बँकेत खाते उघडून धनादेशाची राशी तेथे जमा करण्यात आली. काेऱ्या कागदावर दाणी यांचे हस्ताक्षर घेतले. रजिस्ट्रीची राशीही या हस्ताक्षराद्वारे हस्तगत केली. माेफत शेतीची रजिस्ट्री करण्यास विराेध केल्यानंतर ‘सिक्युरिटी’ म्हणून शेती ठेवत असल्याचे सांगितले. काही दिवसापासून दाणी यांच्या विवेकानंदनगर येथील घरावर कब्जा करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला हाेता. त्यानंतर दाणी यांनी गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली.
करीत हाेते पावणेसहा काेटीची मागणी
नगदी व शेतीसह तीन काेटी वसूल केल्यानंतरही डेकाटे टाेळीचा दाणी यांच्यावरील दबाव वाढत हाेता. साडेसहा काेटी कर्ज असल्याचे ते सांगत हाेते. मार्च २०१८ मध्ये जबरदस्ती स्टॅम्पपेपरवर हस्ताक्षर करून घराची मूळ रजिस्ट्री व चावी ताब्यात घेतली. आयकर विभागाने दाणी यांचे घर अटॅच केले हाेते. ही माहिती हाेताच डेकाटे दाणी यांनी एका महिला आयकर अधिकाऱ्याकडे घेऊन गेला. मात्र डेकाटेकडून आपण कधी पैसे घेतले नसल्याचे दाणी यांनी सांगितले. तेव्हा काळे व साबणेकडून घेतलेले पैसे आपलेच असल्याचे सांगत, घरही घेऊ आणि पैसाही वसूल करू, अशी धमकी दिली. नाेव्हेंबर २०२० मध्ये घराची रजिस्ट्री न करता पुण्याला गेल्यास मारहाण करून नागपूरला परत आणण्याची धमकी डेकाटे टाेळीने दाणी यांना दिली.