कारगील विजय दिन; हात फ्रॅक्चर, तरी २८ दिवस बजावली सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:05 AM2019-07-26T11:05:17+5:302019-07-26T11:05:43+5:30
कारगीलची लढाई म्हणजे वीरश्रीचा इतिहास ! सैनिकांची मने त्वेषाने पेटून उठलेली अन् देशवासीयांची मने प्रचंड भारवलेली. कारगीलच्या या ६० दिवसांच्या लढाईत सबंध देश सैनिकांच्या पाठीशी होता.
गोपालकृष्ण मांडवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारगीलची लढाई म्हणजे वीरश्रीचा इतिहास ! सैनिकांची मने त्वेषाने पेटून उठलेली अन् देशवासीयांची मने प्रचंड भारवलेली. कारगीलच्या या ६० दिवसांच्या लढाईत सबंध देश सैनिकांच्या पाठीशी होता. जीवाची आणि खाण्यापिण्याची पर्वा न करता सैनिकांनी लढा जिंकला. कुणी चार दिवस उपाशाी राहिले तर कुणी आपल्याच रक्तबंबाळ होऊन धारातीर्थी पडलेल्या सहकाऱ्याच्या हातातील बंदूक घेऊन शत्रूवर निशाणा साधला...! सारेच काही भारावलेले !
ही लढाई सर्वांचीच होती. लष्करातील प्रमुखांपासून तर सर्वसामान्य सैनिकांपर्यंत सारेच पेटून उठले होते. नागपूर जिल्ह्यातून सैन्यात दाखल असलेल्या हजारो जवानांनी या लढाईत सहभाग घेतला. कुहीतील गौतम बाबूराव कांबळे या सैनिकाचाही या लढाईत सहभाग होता. योगायोग असा की, ज्या उधमपूर नॉर्थ कमांडअंतर्गत ही लढाई झाली त्याच कमांडमध्ये या नागपूरकर पुत्राचा सहभाग होता. कारगील विजय दिनाच्या निमित्ताने या सैनिकाने ‘लोकमत’जवळ आठवणी सांगितल्या. आठवणींचा एकेक पट उलगडत गेला आणि जवानांच्या वीरश्रीचा इतिहासही पुन्हा प्रकाशमान होत गेला.
गौतम कांबळे १९९९ मध्ये उधमपूरमध्ये नायक पदावर सेवेला होते. सीमेवरून येणारे तोफगोळे, घुसखोरांना परतवणे हे नेहमीचेच सुरू असतानाच कारगील युद्धाला प्रारंभ झाल्याची बातमी वरिष्ठांनी या तुकडीला सांगितली. कमांडरकडून युद्धाचे आदेश आले. सज्जतेचा इशारा मिळाला. भविष्यातील सर्व योजना रहित करून सोबतचे सैनिकही सज्ज झाले. कामांची विभागणी आणि जबाबदारी वाटल्या गेली. गौतम कांबळे यांना सैन्यासाठी वाहतुकीचा मार्ग खुला करून देण्याची जबाबदारी मिळाली. सोबत अन्य तीन सहकारी होते. सीमेवर रसद घेऊन जाणाºया वाहनांना वाट मोकळी करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पाच किलोमीटर परिसरात काही अघटित घडू नये, वाहने विना अडथळ्याने पुढे काढण्२२याचे काम तसे जोखिमीचेच!
जंगल, खाई, खडकातून मार्ग काढत लष्कराची वाहने पास करावी लागायची. काम तसे लहानसे, पण जोखीमही तेवढीच मोठी. वाहन अडलेच आणि सैन्याला वेळेवर रसद आणि सैन्यबळ पोहचले नाही तर गंभीर प्रसंग उभा होणार होता. मात्र कांबळे यांच्या चमूने अडचणीवर मात केली. अशातच एका बेसावध क्षणी ते दुचाकीसह खोल खड्ड्यात पडले. हात फ्रॅक्चर झाला. दुचाकी चालविणेही कठीण झाले. तरीही यास्थितीत त्यांनी तळ गाठला.
हाताचे हाड तुटल्याने डॉक्टरांनी त्यात रॉड टाकलेला होता. आॅपरेशननंतर लगेच बँडेज चढवून ते दुसºया दिवशी सेवेला हजर झाले. अशाही स्थितीत २८ दिवस त्यांनी सेवा बजावली. काम जोखिमीचे, झोपायलाही वेळ नसायचा. डोळ्यात तेल घालून अहोरात्र सेवा द्यावी लागायची. थोडीशी डुलकीही पुरे असायची. देशप्रेमापुढे हाताच्या वेदनाही क्षुल्लक ठरत होत्या.
जवळपास ६० दिवस चाललेल्या या लढाईत दोन लाख सैनिकांना विविध जबाबदाऱ्यांवर सरकारने पाठविले होते. तोफगोळे, तप्त ज्वाला अन् बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करीत ५२७ सैनिकांनी भारतमातेच्या वेदीवर आपले प्राण अर्पण केले. ६० दिवसांच्या लढाईनंतर २६ जुलै १९९९ रोजी या युद्धसंघर्षाची अधिकृ तपणे सांगता झाल्याची घोषणा झाली.
विजय गौतम कांबळेंच्या धैर्याचाही!
युद्धानंतर नऊ महिन्यांनी सर्वकाही स्थिरस्थावर झाले. देशाच्या सीमा शांत झाल्या. गौतम कांबळे नऊ महिन्यांनी सीमेवरून कुहीला रजेवर परतले. देशाचे रक्षण करून परतलेल्या या वीरपुत्राची गावाने आस्थेवाईकपणे चौकशी केली. कुटुंबाच्या भेटीनंतर आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली. ज्येष्ठांनी डोक्यावरून हात फिरवून सुखरूप परतल्याचा आनंद व्यक्त केला. तिकडे कारगीलचा विजय झाला अन् इकडे गौतम कांबळेंच्या धैर्याचाही! देशासाठी स्वत:च्या वेदनांची पर्वा न करणारे गौतम कांबळे सध्या नागपुरातील वन विभागात सेवा बजावत आहेत.