ब्रिजेश तिवारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काेराेना संक्रमण कमी हाेताच शासनाने टाळेबंदी शिथिल केली आणि टप्प्याटप्प्याने शाळा व महाविद्यालये देखील सुरू केले. पालकांच्या संमतीने दीर्घ काळानंतर विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांमध्ये दाखल झाले. त्यातच शिक्षक काेराेना संक्रमित व्हायला सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण हाेत आहे. काेंढाळी (ता. काटाेल) येथे प्राचार्यासह पाच शिक्षक काेराेनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शाळा, महाविद्यालये काेराेना हाॅटस्पाॅट बनताहेेत की काय असे वाटायला लागले आहे.
राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर शाळा व महाविद्यालये दाेेन टप्प्यात सुरू करण्यात आले. तत्पूर्वी शाळा, महाविद्यालयांच्या इमारत व परिसराच्या साफसफाईसह निर्जंतुकीकरण केल्याची तसेच काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची खात्री पटवण्यात आली. एवढेच नव्हे तर शिक्षकांची काेराेना चाचणी अनिवार्य करण्यात आली. पालकांनी संमती दिल्यानंतर विद्यार्थी शाळेत पाेहाेचले. यात काेंढाळी येथील शाळा महाविद्यालयांचा समावेश आहे.
काेंढाळी येथील एका प्रसिद्ध शाळेत स्थानिक व परिसरातील गावांमधील एकूण तीन हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेतात. या शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व पाच शिक्षकांना काेराेनाची लागण झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे. हे पाचही शिक्षण सीबीएसई अभ्यासक्रमाचे आहेत. त्यामुळे ही शाळा शनिवारपासून (दि. २०) बंद करण्यात आली आहे. काेराेना संक्रमणाचा संभाव्य धाेका आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता ग्रामीण भागातील सुरू असलेल्या इतर शाळा तातडीने काही काळासाठी बंद कराव्या, अशी मागणीही पालकांनी केली आहे.
...
बसमध्ये उपाययाेजनांचा फज्जा
ग्रामीण भागातील विद्यार्थी काेंढाळी येथील शाळेत बसने ये-जा करतात. बसफेऱ्यांची माेठी कमतरता असल्याने यातील बहुतांश विद्यार्थी नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या नागपूर-आर्वी या एकमेव बसने प्रवास करतात. त्या बसमध्ये एकावेळी किमान ६० ते ६५ विद्यार्थी प्रवास करतात. एका सीटवर किमान पाच ते सहा विद्यार्थी बसतात. या बसमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचा फज्जा उडताे.
...
काेराेना संक्रमित रुग्ण
काेंढाळीसह काटाेल शहर व तालुक्यात काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेताना दिसून येत आहे. गुरुवारी (दि. १८) काटाेल शहरातील पंचवटी येथे चार, तारबाजारात तीन, हाेळी मैदान परिसर, थूल लेआऊट, फैलपुरा, सगमानगर, लक्ष्मीनगर, ठोमा ले-आऊट, देशमुखपुरा येथे प्रत्येक एक तर काटाेल तालुक्यातील वाई, लाडगाव, मेटपांजरा, पारडसिंगा येथे प्रत्येकी एक तर काेंढाळी पाच रुग्ण आढळून आले हाेते. काटाेल शहरात १५ तर ग्रामीण भागात नऊ रुग्ण हाेते. यात दिवसेंदिवस भर पडत आहे.