लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोंदियातून भाजी घेऊन आलेल्या एका वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुकानासमोर झोपलेल्या एका व्यापाऱ्याला चिरडले. संतोष जगन्नाथ चव्हाण (वय ४५) असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून, शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे कॉटन मार्केटच्या सब्जी मंडी परिसरात तीव्र शोककळा पसरली.यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिनाकी मंगळवारीत राहणारे संतोष चव्हाण यांचे कॉटन मार्केटच्या म. फुले सब्जी मंडीत दुकान आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि पहाटेच भाजी बाजारातील व्यवहार सुरू होत असल्यामुळे चव्हाण त्यांच्या दुकानासमोरच झोपत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री ते झोपले होते. आरोपी साहेबलाल तिलकचंद शिसोदे (वय ६०, रा. हिवरा, गोंदिया) हा भाजी बाजारात शनिवारी पहाटे ३.४५ ते ४ च्या सुमारास भाजीचा ट्रक घेऊन आला. त्याने निष्काळजीपणे वाहन (एमएच ३५/ १३९३) चालवून चव्हाण यांना चिरडले. चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे बाजारात तीव्र शोककळा पसरली. फिर्यादी रोशन गणेश नायकेले (वय ३४, रा. हुडकेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी शिसोदेला अटक करण्यात आली आहे.
भरधाव वाहनाने भाजी व्यापाऱ्याला दुकानासमोरच चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:45 PM
गोंदियातून भाजी घेऊन आलेल्या एका वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दुकानासमोर झोपलेल्या एका व्यापाऱ्याला चिरडले.
ठळक मुद्देनागपूरच्या कॉटन मार्केट येथील घटना