लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : पाेलिसांच्या पथकाने नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील व्याहाड पेठ परिसरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले. यात ट्रकचालक, क्लिनर व मालक अशा एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि. १८) रात्री करण्यात आली.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अमन कलंदर शाह (३८, रा. हैदरपुरा, खाेलापुरी गेट अमरावती), कलीम निसार खान (४६, रा. पठाणपुरा चौक, नागपुरी गेट, अमरावती), शेख सद्दाम मोहम्मद (३८, रा. वलगाव रोड, कामुजा, अमरावती), शेख सोहेल शेख हमीद (२६, रा. पठाण चौक, नागपुरी गेट, अमरावती), अविनाश राजेंद्र शिरभाते (२३, रा. कुऱ्हा, ता. तिवसा, जिल्हा अमरावती), सोहेब खान इजाज खान (२०, रा. वलगाव, अमरावती) व शेख इमरान खान नौशाद (३८, रा. मोझरी गुरुकुंज, ता. तिवसा, अमरावती) या सात जणांचा समावेश आहे.
वाडी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरून अमरावतीच्या दिशेने रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी व्याहाड पेठ शिवारात नाकाबंदी करून एमएच-२१/बीएक्स-९७९९, एमएच-२७/बीएक्स-६६९९ व एमएच-३०/एव्ही-६६९९ क्रमांकाचे तीन ट्रक थांबवून झडती घेली. त्यात रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच तिन्ही ट्रक ताब्यात घेत ट्रकचालक, क्लिनर व मालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला.
हे ट्रक सोहेब खान इजाज खान व शेख इमरान खान नौशाद यांच्या मालकीचे असल्याची माहिती ट्रकचालकांनी दिली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून प्रकरण पुढील तपासासाठी हिंगणा पाेलिसांकडे वर्ग केले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, हवालदार सुनील मस्के, प्रदीप ढोके, प्रवीण फलके, सतीश येसकर यांच्या पथकाने केली.
...
कन्हान नदीतील रेती
या तिन्ही ट्रकमधील रेती कन्हान नदीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती सावनेर तालुक्यातून आणल्याची माहिती ट्रकचालकांनी पाेलिसांना दिली. सध्या संपूर्ण रेतीघाट बंद असताना ही रेती कुठून व कुणाकडून आणली, याचा मात्र पाेलीस शाेध घेणार नाही. जप्त करण्यात आलेली रेती किती ब्रास आहे, हेही सांगण्यास पाेलिसांनी नकार दिला. माेजमाप करण्यासाठी रेतीचे वजन केल्याचे पाेलिसांनी सांगितले. या प्रकरणात महसूल विभागातील अधिकारी गप्प असून, पाेलीस चाेरीचा गुन्हा दाखल करण्याशिवाय काहीही करू शकत नाही, असेही जाणकार व्यक्तींनी सांगितले.